लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती करण्याची गरज

लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती करण्याची गरज

sexual harassment

मुंबई -: मुंबई महापालिकेच्या २४ प्रभाग कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार होत असल्यास तात्काळ ‘लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समिती’कडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पालिका मुख्यलयात कार्यरत समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) रश्मी लोखंडे यांनी केले आहे. सदर समितीतर्फे पालिका मुख्यालयात महिलांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या लैंगिक अत्याचारविरोधात जनजागृती करण्यासाठी समिती अध्यक्षा लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना रश्मी लोखंडे यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील विविध कार्यालये ही महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित असावीत. या हेतूने ‘लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समिती’ विविध कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. यानुसार महापालिका मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या समितीची एक विशेष बैठक नवरात्रोत्सवाच्या औचित्याने नुकतीच आयोजित करण्यात आली होती. समिती अध्यक्ष तथा प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) रश्मी लोखंडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या बैठकी दरम्यान एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

महापालिका मुख्यालयासाठीच्या ‘कार्यस्थळी लैंगिक अत्याचार प्रतिबंध समिती’मार्फत पालिका मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांमध्ये लैंगिक अत्याचाराबाबत जागरूकता आणण्याच्या दृष्टीने या बैठकीचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यालयातील महिला अधिकारी व कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे आणि सावित्रीबाई फुले संसाधन समितीच्या सचिव अपूर्वा प्रभू, प्रमुख कर्मचारी अधिकारी अपूर्वा मोरे आणि मान्यवर महिला अधिकारी उपस्थित होत्या. या बैठकीच्या प्रारंभी, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) तथा समिती अध्यक्षा रश्मी लोखंडे यांनी महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक अत्याचार कशा प्रकारचे असू शकतात आणि या विरोधात तक्रार नोंदवणे का आवश्यक असते, याबाबत थोडक्यात माहिती दिली.

यावेळी के. सी. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महिला अत्याचाराच्या स्वरूपावर एक पथनाट्य सादर केले. अपूर्वा प्रभू यांनी विशाखा मार्गदर्शक तत्वे तसेच लैंगिक अत्याचाराबाबत असणारे विविध कायदे व तरतुदी यांची माहिती दिली. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. मंगला गोमारे यांनी महिलांना लैंगिक अत्याचाराबाबत माहिती दिली. तसेच पालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस रश्मी लोखंडे यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.


हेही वाचाः जालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर; अशोकराव चव्हाणांच्या संकल्पनेतील प्रकल्पाला गती

First Published on: October 4, 2022 10:15 PM
Exit mobile version