जनता दल उद्या करणार राज्यव्यापी ‘रास्तारोको आंदोलन’

जनता दल उद्या करणार राज्यव्यापी ‘रास्तारोको आंदोलन’

आंदोलन

राज्यातील शेतकरी, शेतमजूर, मच्छिमार अन्य कष्टकरी यांना दरमहा पाच हजार रुपये निवृत्तीवेतन, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांचे मानधन २ हजार रुपये करण्याच्या मागणीसाठी जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र पक्षातर्फे येत्या २५ फेब्रुवारी रोजी राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांची अवस्था आज अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. वृद्ध शेतकऱ्यांच्या अवस्थेला तर कुणी वाली नाही, अशीच त्यांची सध्याची परिस्थीती झाली आहे. कुटुंबालाच पोसता येत नसताना वृद्धाना सांभाळायचे कुणी, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. परिणामी मरेपर्यंत काम करणे वा झिजत झिजत मरून जाणे, एवढेच या वृद्ध शेतकऱ्यांच्या हाती उरले आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या पोशिंद्याला वयाची साठी पार केल्यानंतर सरकारने निवृत्तीवेतन द्यावे, अशी मागणी गेली काही वर्षे जनता दलाने लावून धरली आहे. मात्र अद्याप मागण्या मान्य न झाल्याने जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र पक्षातर्फे राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यात रास्तारोको आंदोलन

आपल्या विविध मागण्यासाठी हजारो शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेऊन ते राज्य सरकारला सादर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पक्षातर्फे दोन वेळा मुंबईत मंत्रालयावर तर एकदा नागपूर येथे विधिमंडळावर हजारो शेतकऱ्यांचे मोर्चे नेण्यात आले होते. तसेच शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष यात्राही काढण्यात आली होती. तसेच राज्यपाल विद्यासागर राव यांचीही पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्यांनी त्यावेळी सर्व पक्षीय बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतही याबाबत राज्य सरकारकडून काहीच हालचाल झालेली नाही.

मानधनात वाढ करा – जनता दलाची मागणी

वास्तवात आज देशातील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गोवा, सिक्कीम, उत्तराखंड आदी राज्यांमधे शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन मिळत आहे. अलीकडच्या काळात मध्य प्रदेश, दिल्ली, हरयाणा या राज्यांनीही शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याची घोषणा केली आहे. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी त्याचप्रमाणे पुतळे आणि स्मारके उभारण्यासाठी हजारो कोटी खर्च करणारे राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांप्रती सहानुभूतीची भूमिका घ्यायला तयार नाही. तर दुसरीकडे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेअंतर्गत निराधार व्यक्तीना अवघे ६०० रूपये मानधन देण्यात येत असून गरिबांची ही थट्टा आहे. या मानधनात वाढ करून ते किमान २ हजार रुपये करावे, अशी जनता दलाची मागणी आहे. या दोन्ही मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवार २५ फेब्रुवारी रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पक्षातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पक्षाचे हजारो कार्यकर्ते त्या दिवशी रस्त्यावर उतरणार असून शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन निवृत्तीवेतनाची मागणी मान्य करण्यास सरकारला भाग पाडावे, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष शरद पाटील, प्रधान महासचिव प्रताप होगाडे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केले आहे.


हेही वाचा – राज्यात जनता दल ५ जागांवर लढणार

हेही वाचा – शरद पवार आणि बीजू जनता दलाची बैठक सुरु


 

First Published on: February 24, 2019 8:13 PM
Exit mobile version