‘…यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसतंय’; जयंत पाटलांची नव्या सरकारवर टीका

‘…यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसतंय’; जयंत पाटलांची नव्या सरकारवर टीका

“आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे. यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसत आहे.”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नव्या सरकारवर टीका केली. (Jayant Patil slams new government of maharashtra)

“आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना आमदार राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्ता बदलाच्या ज्या एकंदरीत घटना झाल्या त्या सर्व न्यायालयात गेल्या आहेत. १६ बंडखोर आमदारांचे निलंबन करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांना काढलेल्या नोटीसीला सुप्रीम कोर्टाने ११ जुलैपर्यंत वेळ दिली होती त्याच्याआधी अशी निवडणूक होऊ नये आणि सुप्रीम कोर्टात जे प्रकरण आहे त्याचा खुलासा झाल्यावर व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने पत्र देण्यात आले आहे”, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

उद्या अध्यक्ष पदाची निवड

“विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांची निवड राज्यपालांकडे मागण्यात आली होती. परंतु, राज्यपालांनी त्याला काही महिने परवानगी दिली नव्हती, असे सांगतानाच उद्या अध्यक्ष पदाची निवड होत असताना उपाध्यक्षांना पूर्णपणे सभागृहाचे काम करण्याचा अधिकार आहे किंबहुना त्यांची ती जबाबदारी आहे. ती निरपेक्षपणे पार पाडतील”, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे पन्हा एकदा राज्यात शिवसेना-भाजपाचे नवे सरकार आले आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला होता. शिवाय, त्यांच्यासोबत अनेक आमदारांनीही बंड पुकारला होता.


हेही वाचा – शिंदेंना सेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर समर्थक आमदार आक्रमक, केसरकर म्हणाले… उत्तर देणार

First Published on: July 2, 2022 3:06 PM
Exit mobile version