शिंदेंना सेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर समर्थक आमदार आक्रमक, केसरकर म्हणाले… उत्तर देणार

तर सभागृहाचे नेते आत गेल्यानंतर ते कामकाज ताबडतोब थांबवावं लागतं. जोपर्यंत सभागृहाचे नेते स्थानबद्ध होत नाही, तोपर्यंत पुढचं कामकाज चालत नाही. एवढं या पदाला महत्त्व आहे, असंही दीपक केसरकरांनी अधोरेखित केलं आहे

deepak kesarkar
deepak kesarkar

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर शिंदे गटाचे समर्थक आमदार चांगलेच आक्रमक झालेत. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरून काल हकालपट्टी केली होती. त्यानंतर शिंदे गट याला प्रत्युत्तर देणार आहे. शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं असं सांगण्यात आलं आहे की, पक्षनेतेपदावरून एकनाथ शिंदेंना काढलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीची नोटीस किंवा पत्र शिंदेंना दिलेलं आहे, ते आक्षेपार्ह असल्यामुळे त्याचं रीतसर उत्तर आम्ही पाठवू, त्या उत्तरानंतर त्यांनी ती कारवाई बदलली नाही, तर आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू शकतो, असा इशाराच शिंदे गटाच्या दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. गोव्यात शिंदे समर्थक गटाचे आमदार दीपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.

ज्या वेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला ते आपोआपच सभागृहाचे नेते झालेले आहेत. हे जे पद आहे ते वैधानिक पद आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही प्रशासनाचे मुख्य असता. परंतु सभागृहाचे नेते हे सर्वोच्च पद आहे. कुठलाही आमदार विधानसभेच्या फ्लोअरवर भाषण करत असेल, कुठलंही कामकाज चालू असेल, तर सभागृहाचे नेते आत गेल्यानंतर ते कामकाज ताबडतोब थांबवावं लागतं. जोपर्यंत सभागृहाचे नेते स्थानबद्ध होत नाही, तोपर्यंत पुढचं कामकाज चालत नाही. एवढं या पदाला महत्त्व आहे, असंही दीपक केसरकरांनी अधोरेखित केलं आहे.

म्हणून अनेक वेळेला सभागृहात नेत्यांचा अपमान होतो, त्यावेळेला हक्कभंगाची कारवाईसुद्धा केली जाते. कारण सभागृहाचं कामकाज चांगलं चालावं, या दृष्टीनं या पदाची निर्मिती असते. ते केवळ एका पक्षाचे नसतात, तर संपूर्ण सभागृहामध्ये जेवढे पक्ष आहेत, त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व ते सभागृहाचे नेते म्हणून करत असतात. शिवसेनेनं केलेली कृती त्यांच्याच पक्षाला शोभादायक नाही. एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून काढण्याचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे, त्याविरोधात आम्ही कोर्टात दाद मागितली आहे. त्यांनीसुद्धा आमच्या निलंबनाच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती, पण कोर्टाने ती फेटाळून लावली आहे, अशी कृत्ये लोकशाहीसाठी शोभादायक नसल्याचंही दीपक केसरकरांनी सांगितलंय.


उद्धवसाहेबांच्या वक्तव्याविरोधात आम्ही बोलणार नाही : केसरकर

एकनाथ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याला आव्हान दिले जाईल, त्याचा लोकशाहीवर परिणाम होईल, असंही केसरकरांनी सांगितलंय. उद्धवसाहेबांच्या वक्तव्याविरोधात आम्ही बोलणार नाही. ते आमचे नेते आहेत, असा आमचा अजूनही विश्वास आहे, आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, पण त्याला मर्यादा आहे. शिवसेना सोडणार नसल्याच्या 100 रुपयांच्या शपथपत्रावर कार्यकर्ते स्वाक्षरी करत आहेत. शिवबंधन (व्यक्ती शिवसेनेत आल्यावर बांधलेले) हे प्रेमाचे ‘बंधन’ आहे आणि ते अजूनही आपल्यासोबत आहे. हे केवळ कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी हे काही लोक करत असल्याचंही दीपक केसरकरांनी सांगितलंय.


हेही वाचाः मी चौकशींच्या बाबतीत निडर; संजय राऊतांचा विरोधकांना टोला