खंडोबाची सोमवती यात्रा रद्द; गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद

खंडोबाची सोमवती यात्रा रद्द; गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद

खंडोबाची सोमवती यात्रा रद्द; गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शनिवार ते सोमवार हे तीन दिवस भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे या तीन दिवसात खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार असून मंगळवार नंतर पुन्हा खंडोबा गडावर भाविक जाऊ शकतील, अशी माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे. या यात्रेसाठी मुंबई, नाशिक, नगर आणि पुण्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यातच यंदा भर सोमवती आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी असली असती. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडोबाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यावर बंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा सोमवती यात्रा रद्द करण्यात आली असून पालखी सोहळ्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी तीन दिवस जेजुरीत येऊ नये. त्याचप्रमाणे याठिकाणच्या व्यावसायिकांनी भाविकांना आपल्याकडे उतरून घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मुख्य वतनदार राजाभाऊ पेशवे, सचिन पेशवे, खंडोबा देवस्थानचे विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, विरोधीपक्ष नेते जयदीप बारभाई, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.

भाविकांना घेता येणार मुखदर्शन

खंडोबा गडावर मंगळवारी चंपाषष्टी उत्सव सुरू होणार आहे. या पाच दिवसाच्या काळात ग्रामस्थ आणि भाविकांना नेहमीप्रमाणे मुखदर्शनची सोय करण्यात आली असून प्रथेप्रमाणे पूजा केल्या जातील. तसेच दर्शन मंडपामध्ये पुजारी सेवक अन्नदान मंडळातर्फे पाच दिवस दररोज अन्नदान केले जाणार आहे.


हेही वाचा – खुशखबर! सर्वसामान्यांसाठी लोकल नव्या वर्षात सुरू – चहल


 

First Published on: December 10, 2020 7:35 PM
Exit mobile version