नवीन ठाण्याचा प्रस्ताव फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठीच – जितेंद्र आव्हाड

नवीन ठाण्याचा प्रस्ताव फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठीच – जितेंद्र आव्हाड

ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे आदी गावांमध्ये बिल्डरांनी शंभर-शंभर एकरच्या जमिनी १० वर्षांपूर्वीच विकत घेऊन ठेवल्या आहेत. या बिल्डर लॉबीचा फायदा व्हावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन नवीन ठाण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या सभागृहात तसेच रस्त्यावरही आम्ही विरोध करु, असा इशाराही त्यांनी यांनी दिला. ‘घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं’, अशीच अवस्था सध्या ठाणे महानगरपालिकेची आणि सत्ताधाऱ्यांची झाली आहे, असेही आव्हाड म्हटले आहेत. ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे या महसुली गावांचा विकास आता येत्या काळात शक्य होणार आहे. या गावांचा समावेश नवीन ठाणेमध्ये करून या भागाचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए यांची संयुक्त नेमणूक केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव ठाणे महापालिकेने १९ नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. त्यासंदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी आव्हाड यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. या परिषदेत आव्हाड यांनी महापालिकेवर आरोप केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हेदेखील उपस्थित होते.

हेही वाचा – आव्हाडांची मोदींवर ‘विंडबनात्मक’ कविता

काय म्हणाले आव्हाड?

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाणे शहरात मूलभूत समस्यांची वानवा आहे. केवळ १९९ कोटी रुपये शासनाला देऊन शाई धरण विकत घेता येणार आहे. मात्र, पालिका ते काम करण्याऐवजी भिवंडीला लागून असलेल्या गावांना ठाणे महानगर पालिकेमध्ये सामावून घेऊन नवीन ठाण्याचा प्रस्ताव आणत आहे. आज ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात केली जाणार आहे. आज घोडबंदरला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वागळे इस्टेटमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दिव्याचे नागरिक कचऱ्याच्या दुुर्गंधीने हैराण झाले आहेत. त्यांचा आठवड्यातून दोन तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. याला जबाबदार ठाण्याचे सत्ताधारीच आहेत. ठाणेकर त्यांच्यावर प्रेम करतात म्हणून त्यांना सत्ता मिळते, असा त्यांचा दावा असला तरी हे एकतर्फी प्रेम असून सत्ताधारी शिवसेनेचे ठाण्यावर प्रेमच नाही. त्यामुळे हे एकतर्फी प्रेम ठाणेकरांसाठी घातक ठरत आहे.

हेही वाचा – आव्हाड साहेब ‘इथे’ तुम्हाला गोळी झाडण्याची कुणाची हिमंत नाही!

‘समस्या सोडवण्याऐवजी नवीन ठाणे उभारण्याचा घाट’

आव्हाड म्हणाले की, दर दहा माणशी एक शौचालय असावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र, ही निकड पुर्ण करण्यात पालिका प्रशासन आणि सत्ताधार्यांदना शक्य झालेले नाही. आजही आमच्या मायभगिनी पहाटे पाच वाजता शौचालयास बाहेर जात आहेत, ही लाजीरवानी बाब आहे. या समस्या सोडवण्याऐवजी नवीन ठाणे उभारण्याचा घाट का घातला गेला आहे. जे जुणे ठाणे आहे, ते सांभाळता येत नाही. आता नव्याने हिरानंदानीसह दोस्ती, लोढा यांच्या विकासासाठी नवीन ठाण्याचा हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. मागील दहा वर्षापूर्वीच बिल्डरांनी हा कट रचला होता. भिवंडी पालिकेला लागून असलेल्या या गावांमधील जमिनी बिल्डरांनी विकत घेतल्या आहेत. कवडीमोल किमतीत विकत घेतलेल्या या जमिनींवर नवीन ठाणे उभारायचे असेल तर सातबारावरील सर्व फेरफार रद्द करुन त्या जमिनी ताब्यात घ्याव्यात; साडेबारा टक्क्यांचा हिशोब लावून त्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्यात; सिडकोच्या धर्तीवर स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करुन नवीन ठाण्याचा विकास करावा, त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही आव्हाड यांनी यावेळी केली. या प्रस्तावाला आम्ही विरोध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – भगवद्गीतेवर ‘आव्हाड’ सोशल मीडियावर ट्रोल

‘पारदर्शी मुख्यमंत्र्यांनी ३ हजार कोटी द्यावेत’

जर एमएमआरडीए आणि ठाणे पालिकेला या गावांच्या विकासाचा एवढाच पुळका आला असेल तर त्यांनी ज्या प्रमाणे कडोंपमामध्ये ग्रोथ सेंटर उभारण्यासाठी ६ हजार ५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी यावेळी आनंद परांजपे यांनी केली. मात्र, कल्याण-डोंबिवलीप्रमाणे फसवी घोषणा न करता निधी मिळेल, अशीच घोषणा करावी, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली. तसेच, येत्या १९ नोव्हेंबरच्या महासभेत विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका मांडून नवीन ठाण्याच्या प्रस्तावाला विरोध करतील, असेही परांजपे यांनी सांगितले.


हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त ट्विट; धनगर समाज संतप्त

First Published on: November 14, 2018 10:24 PM
Exit mobile version