शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी भाजपाचे ठाकरे गटाला समर्थन? उपाध्येंचे ट्वीट

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी भाजपाचे ठाकरे गटाला समर्थन? उपाध्येंचे ट्वीट

मुंबई – शिवतिर्थावरील दसरा मेळाव्याबाबत राज्यात संघर्ष सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने शिवाजी महाराज पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे पेंग्विनसेनेला शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी उपहासात्मक मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलं आहे की,’शिवाजी पार्कवर पेंग्विनसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे कारण बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहातोय.’


राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात ५ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्यावरून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयात परवानगीसाठी अर्ज सादर केला. या अर्जावर अद्याप महापालिकेकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच शिंदे गटानेही याच जागी दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले आहे, तर तिसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दसरा मेळाव्याला संबोधित करावे, अशी मागणी मनसैनिकांनी पत्र लिहून केली आहे.

हेही वाचा – शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा?

त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी परवानगी कुणाला मिळणार आणि शिवतीर्थावरून विचारांचे सोने नेमका कुठला नेता देणार याबद्दलची कार्यकर्त्यांची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासक असल्याने महापालिकेवर अप्रत्यक्षरित्या शिंदे सरकारचेच नियंत्रण आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची पूर्ण कोंडी करण्याचा डाव शिंदे गटाने आखलेला आहे. त्यासाठी बीकेसी, सौमय्या, नेस्को आणि इतर छोटी मैदानेही अडवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचे समजत आहे.

हेही वाचा – शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांचे अर्ज, पालिका अधिकारी संभ्रमात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून ते अंतिम श्वासापर्यंत शिवाजी पार्कवर आपल्या ठाकरी शैलीतील भाषणाने दसरा मेळावा गाजवला. त्यानंतर शिवसेनेची जबाबदारी सांभाळणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपवादात्मक परिस्थिती वगळता दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिंदे गटाने आधी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर आता दसरा मेळावा देखील हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हेही वाचा – हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवा, दसरा मेळाव्यासाठी मनसैनिकांची राज ठाकरेंना साद

First Published on: September 7, 2022 11:50 AM
Exit mobile version