घरमुंबईशिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा?

शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा?

Subscribe

राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात ५ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्यावरून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे.

राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात ५ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्यावरून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. या अर्जावर अद्याप महापालिकेकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच शिंदे गटानेही याच जागी दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले आहे, तर तिसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दसरा मेळाव्याला संबोधित करावे, अशी मागणी मनसैनिकांनी पत्र लिहून केली आहे.

त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी परवानगी कुणाला मिळणार आणि शिवतीर्थावरून विचारांचे सोने नेमका कुठला नेता देणार याबद्दलची कार्यकर्त्यांची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासक असल्याने महापालिकेवर अप्रत्यक्षरित्या शिंदे सरकारचेच नियंत्रण आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची पूर्ण कोंडी करण्याचा डाव शिंदे गटाने आखलेला आहे. त्यासाठी बीकेसी, सौमय्या, नेस्को आणि इतर छोटी मैदानेही अडवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचे समजत आहे.

- Advertisement -

कोरोनानंतर शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयात परवानगीसाठी अर्ज सादर केला. त्यानंतर शिवसेनेने संबंधित कार्यलयाकडे पाठपुरावा करीत स्मरणपत्रही दिल्याचे समजते, मात्र पालिकेने त्यांना होकार किंवा नकारही कळवलेला नाही, तर दुसरीकडे शिंदे गटातर्फे ३० ऑगस्ट रोजी जी/ उत्तर कार्यलयाला दसरा मेळावा त्याच दिवशी शिवाजी पार्कवर घेण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा आपला अर्ज सादर केला आहे. आता दोन्ही अर्ज आल्याने नेमकी परवानगी कोणाला द्यावी, असा पेचप्रसंग पालिकेच्या अधिकार्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून ते अंतिम श्वासापर्यंत शिवाजी पार्कवर आपल्या ठाकरी शैलीतील भाषणाने दसरा मेळावा गाजवला. त्यानंतर शिवसेनेची जबाबदारी सांभाळणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपवादात्मक परिस्थिती वगळता दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिंदे गटाने आधी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर आता दसरा मेळावा देखील हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

- Advertisement -

मी शिवसेना म्हणून अर्ज केला आहे. आम्हाला परवानगी मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील.
-सदा सरवणकर, आमदार, शिंदे गट

शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्कवर गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित करीत आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचा पारंपरिक सोहळा आहे. त्यासाठी आम्ही नियमानुसार पालिकेकडे परवानगीसाठी अगोदरच अर्ज सादर केला आहे. त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळणार असून त्यांचा मुखवटा गळून पडला आहे.
शिंदे गटाकडून उगाचच आम्हाला दिवचण्याचा प्रकार सुरू आहे.
– मनीषा कायंदे, आमदार, शिवसेना

हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवा-संदीप देशपांडे
दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचं आयोजन करावं. त्यांनीच राज्यातील हिंदू जनतेला मार्गदर्शन करावे, अशी विनंती मनसैनिकांकडून करण्यात आली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे पत्र आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे राज ठाकरे! त्यामुळे, दसर्‍याला आपण दिवंगत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणार्‍या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -