उद्धव ठाकरे होणार राज्यपाल नियुक्त आमदार

उद्धव ठाकरे होणार राज्यपाल नियुक्त आमदार

कोरोना विषाणूने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. महाराष्ट्रावर आलेल्या या संकटाशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या शर्थीने सामना करत आहेत. परंतु, या संकटात उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारकी नसल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपद जाण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु, या सर्व राजकीय चर्चांवर अखेर पडदा पडला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आमदार होणार

महाराष्ट्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारकी नसल्याने त्यांचे मुख्यमंत्रिपद जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, आता यावर तोडगा निघाला असून, उद्धव ठाकरे हे आता राज्यपाल नियुक्त आमदार होणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तसा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल यांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर निवड करण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. तर येत्या २४ एप्रिल रोजी राज्य विधानपरिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात. मात्र, कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे, उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आता हा धोका टळला आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशात सध्या लॉकडाऊन असल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अवघड आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती पाहता या निवडणुकांची पुढील तारीख निश्चित करणे देखील शक्य नाही. विधान परिषदेच्या या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत राज्यात घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. त्या दृष्टीने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.  – नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री


हेही वाचा – Coronavirus : ठाण्यातही ‘कोरोना कंटेनमेंट झोन’ जाहीर करा!


 

First Published on: April 9, 2020 1:47 PM
Exit mobile version