Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम

बारामती तालुक्यात आज सकाळी १० वाजल्यापासून ४९ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने चांगलीच जय्यत तयारी केली होती. सर्व राजकीय आणि वरिष्ठ नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. तसेच इतर राजकीय पक्षांनीही प्रचारादरम्यान प्रचंड मेहनत घेतली होती. बारामती तालुक्यात पहिल्या तीन टप्प्यात प्रत्येकी १५ तर चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीने चांगलीच मुसंडी मारली आहे. तालुक्यात सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर उमेदवारांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण आणि हास्याचे भाव दिसत होते. मतमोजणी सुरु असलेल्या हॉलबाहेर सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.

यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि उमेदवार विजय झाल्यास गुलाल उधळणे आणि फटाक्यांची आतषबाजी करणयास मनाई केली आहे. त्यामुळे याचा चांगलाच परिणाम पाहायला मिळाला. तसेच तहसिलदार विजय पाटील यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे निकाल वेगाने हाती आले आहेत.

तालुक्यातील मतमोजणी केंद्राबाहेर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, राहुल आवारे यांच्सासह पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे व इतर पोलीस सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सांगवीमध्ये राष्ट्रवादीच्या १० उमेदवारांचा तर तावरे यांच्या पाच उमेदवारांचा विजय झाला आहे. सांगवीमध्ये चंद्रराव तावरे यांनी ताकद पणाला लावली होती. परंतु तेथेही त्यांचा पराभव झाला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या पॅनलने कोऱ्हाळे बुद्रुकमध्ये एकहाती विजय मिळविला आहे. तर खोमणे यांच्या पॅनलला आठ जागा मिळाल्या आहेत. सुनील भगत पॅनलला ४ तर लालासाहेब माळशिकारे यांच्या पॅनलला तीन जागा मिळाल्या आहेत. धैर्यशिल राजेनिंबाळकर व अनिलकुमार शहा आणि वडगाव निंबाळकमध्ये सुनील ढोले यांच्या पॅनलला अकरा जागा मिळाल्या आहेत. तसेच संग्रामसिंह राजेनिंबाळकर यांच्या पॅनलला पाच जागा मिळाल्या आहेत.

First Published on: January 18, 2021 3:54 PM
Exit mobile version