सीमा प्रश्नासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई ३ डिसेंबरला बेळगावला जाणार

सीमा प्रश्नासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई ३ डिसेंबरला बेळगावला जाणार

मुंबई – सीमा लढ्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी सीमा भागासाठी नेमलेले समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे येत्या ३ डिसेंबरला बेळगावला जाणार आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पाठोपाठ सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यावर हक्क सांगितला. येथील कन्नड भाषिक गावांनी कर्नाटकात सामील व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे, त्यांच्या या विधानाने महाराष्ट्र आणि कर्नाटकात वाद निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून बेळगावला येण्याची आणि सीमा लढ्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची विनंती केली होती. पाटील यांनी ही विनंती मान्य केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावला येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभुराज देसाई ३ डिसेंबर रोजी दिवसभर बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ट्विट करून दिली.


हेही वाचा : राज्यपालांचा राजीनामा घेण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना, राजीनाम्याच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया


 

First Published on: November 28, 2022 10:57 PM
Exit mobile version