तुझं-माझं करण्यापेक्षा एकत्र येऊन मराठ्यांना न्याय देऊ, संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती

तुझं-माझं करण्यापेक्षा एकत्र येऊन मराठ्यांना न्याय देऊ, संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती

संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा मविआवर आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजीराजे यांनी महाराष्ट्र दौरा केला असून सध्या मुंबईत आजी-माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांची भेट घेत आहे. यानंतर शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आपली भूमिका मांडणार आहे. तत्पुर्वी संभाजीराजे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीसांनी भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राजेंनी मराठा समाजाच्या व्यथा आणि सत्यपरिस्थिती फडणवीसांना सांगितली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजे आणि फडणवीस यांच्यात तब्बल आर्धा तास चर्चा झाली आहे. माझं- तुझं करण्यापेक्षा सगळे एकत्र येऊ समाजाला न्याय देऊ अशी विनंती खासदार संभाजी राजे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी म्हटले आहे की, मराठा समाजातील लोकांची वाईट परिस्थिती आहे. लोकं दुःखी,अस्वस्थ आहेत हे त्यांना सांगितले आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून नाही दिला तर त्यांना आपण सर्वजण जबाबदार असून त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायच्या असेल तर राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार करावा लागेल असेही फडणवीसांना सांगितले असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

तसेच माझ-तुझ न करता एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ अशी विनंती फडणवीसांसह सर्व नेत्यांना केली असल्याचे राजेंनी सांगितले आहे. दरम्यान संभाजीराजे भाजप खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संभाजीराजे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शुक्रवार दुपारी ३ वाजता राजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. या भेटीनंतर राजे मोठा निर्णय घेतील अशी चर्चा सध्या रंगली आहे. सर्व पक्षप्रमुखांच्या भेटीनंतर खासदार संभाजी राजे काय भूमिका मांडणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

संभाजीराजेंची शरद पवार, राज ठाकरेंना भेट 

खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका दाखवली असल्याचे सांगितले आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यास पाठिंबा असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.

First Published on: May 28, 2021 1:17 PM
Exit mobile version