५ जुलैपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा…; मेटेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

५ जुलैपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा…; मेटेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. येत्या ५ जुलै पर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आगामी पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. बीडमध्ये आज विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विनायक मेटेंनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला इशारा दिला आहे.

यावेळी विनायक मेटेंनी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर देखील जोरदार टीकेची झोड उठवली. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र अशोक चव्हाण यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शिवाय २०१४ साली जे आरक्षण दिले ते देखील चुकीचे होते, त्यामुळे त्याचा फटका आज मराठा समाजाला बसला आहे, अशी टीका विनायक मेटेंनी केली. काँग्रेसच्या मनात मराठा समाजाबद्दल जी गरळ आहे ती काढायची झाल्यास अशोक चव्हाणांची आधी हकालपट्टी करा, तोवर आंदोलन थांबणार नाही, अशी घोषणाही मेटेंनी आज आंदोलनात दिली.

सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येणार नाही 

ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. आपण न्यायालयात गेल्यानंतर सरकारने मराठा समाजाला इडब्ल्यूएस आरक्षण दिले. सरकारला लाथा घातल्याशिवाय त्यांना जागा येत नाही, असे लक्षात आले आहे. त्यामुळे सरकारला लाथा घालण्यासाठी पुढे या असे जाहीर आवाहन विनायक मेटेंनी केले. तसेच आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरूच राहील, असेही ते म्हणाले.

First Published on: June 5, 2021 4:32 PM
Exit mobile version