एमबीबीएसच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार!

एमबीबीएसच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार!

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वैद्यकीय अभ्याससक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता एमबीबीएसच्या पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षाच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत, असेही देशमुख म्हणाले.

परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर येणे-जाणे किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बर्‍याच अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व पाहता परीक्षा पुढे ढकलणे शक्य असल्याने, आम्ही हा निर्णय घेतला, असे अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील ३५० जण कोरोना संसर्गाने ग्रासले आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, तसेच १९ एप्रिलला सुरू होणार्‍या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य सरकारने अत्यंत कमी वेळेत रुग्णालयात सोयी वाढवल्या, शेकडो खाटा असलेल्या कोविड केअर सेंटर उभारले. ऑक्सिजनयुक्त खाटाही वाढवल्या. त्यामुळे आता महाराष्ट्रात हळूहळू स्थिती नियंत्रणात येत आहे. त्याचप्रमाणे नागपुरात ही स्थिती हळूहळू सुधारत असल्याचा दावा देशमुख यांनी केला. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे, परदेशातून लस आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. लोकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. हे कोरोना विरोधातल्या लढाईत महत्वाचे आहे, असे अमित देशमुख म्हणाले.

First Published on: April 27, 2021 4:30 AM
Exit mobile version