Milind Deora यांचा राजीनामा दुर्भाग्यपूर्ण; फेरविचार करण्याचे वर्षा गायकवाड यांचे आवाहन

Milind Deora यांचा राजीनामा दुर्भाग्यपूर्ण; फेरविचार करण्याचे वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्ती समजले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे सर्वात जुन्या पक्षाशी 55 वर्षांचे असलेले नाते संपुष्टात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी, देवरा यांचा हा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी याबाबत फेरविचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा – Milind Deora यांच्या राजीनाम्यावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया, म्हणाले – “काँग्रेसने…”

काँग्रेसेच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून (X) याची माहिती दिली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मिलिंद देवरा यांनी केले आहे. मात्र, आता या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. ठाकरे गटाची ही पारंपरिक जागा असून विद्यमान खासदार अरविंद सावंत हेच येथील उमेदवार असतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. याच कारणास्तव मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

तर दुसरीकडे, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज, रविवारी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांचे लक्ष केंद्रित करण्याचा पक्षाचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून सुरू होणारी भारत जोडो न्याय यात्रा 15 राज्यांतून जाणार असून याद्वारे लोकसभेच्या 100 जागांचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले आहे. पक्षाने सुरुवातीला इम्फाळ येथून प्रवास सुरू करण्याचे नियोजित केले होते, परंतु त्यासाठी मंजुरी मिळाली नाही.

हेही वाचा – सर्वात तरुण खासदार बनून राजकारणात छाप पाडणारे Milind Deora आहेत कोण?

या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. देवरा कुटुंबाचे काँग्रेस परिवाराशी एक वेगळे समीकरण आहे. काँग्रेसच्या सुख-दुःखात मुरली देवरा हे पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिले होते. त्यामुळे त्यांचे पुत्र मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दुर्भाग्यपूर्ण आहे. वैयक्तिक पातळीवर आणि काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून आज मला फार दुःख झाले असून त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आमदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

तसेच, आम्ही मिलिंद देवरा यांच्याशी सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस परिवार एकत्र राहायला हवा, हाच काँग्रेस प्रभारी यांच्यासह आम्हा सर्वांचा कायम प्रयत्न राहिला, असे सांगून त्या म्हणाल्या की, आजपासून काँग्रेसकडून ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होत आहे आणि नेमके आजच मिलिंद देवरा यांनी हे पाऊल उचलले यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.

हेही वाचा – Congress : भारत जोडो न्याय यात्रेला अपशकून करण्याचा अयशस्वी प्रयत्न, थोरातांची देवरांवर टीका

First Published on: January 14, 2024 1:46 PM
Exit mobile version