Monsoon Update: आता मान्सून ईशान्येकडे पोहोचला, देशाच्या ‘या’ भागांत कोसळणार; IMDचा ताजा अंदाज

Monsoon Update: आता मान्सून ईशान्येकडे पोहोचला, देशाच्या ‘या’ भागांत कोसळणार; IMDचा ताजा अंदाज

नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागरातून ईशान्य भारतात दाखल झाला असून, येत्या दोन दिवसांत आसाम आणि मेघालयात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराच्या काही भागात, ईशान्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकला आहे. तसेच तो मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या बहुतांश भागात पोहोचला आहे, अशी माहिती हवामान खात्याने (IMD) गुरुवारी दिली.

बुधवारी मान्सून कर्नाटकातील बंगळुरू, चिकमंगळूर आणि कारवार येथे पोहोचला होता. अरबी समुद्रातून भारताच्या दक्षिण द्वीपकल्पाकडे येणारे मान्सूनचे वारे पाहता कर्नाटक, केरळ, लक्षद्वीपच्या किनारी आणि दक्षिणेकडील भागात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील पाच दिवसांनंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी या भागात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे हवामान विभागाने येत्या दोन दिवसांत राजस्थान, दक्षिण पंजाब आणि दक्षिण हरियाणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, शुक्रवारी आकाश अंशतः ढगाळ राहील आणि शहरात हलका पाऊस पडू शकतो. शुक्रवारी कमाल आणि किमान तापमान 42 आणि 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात शहरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसून पुढील तीन दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

देशातील विविध ठिकाणी तीन हवामान यंत्रणा कार्यान्वित असल्यानं इंदूरसह इतर राज्यांतील हवामानाच्या बदलासंदर्भात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. अनुकूल परिस्थितीमुळे नैऋत्य मोसमी पाऊसही सातत्याने पुढे सरकत आहे. वातावरणातील आर्द्रतेमुळे मध्य प्रदेशात पावसाचे ढग तयार होऊ लागले आहेत. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार आणि हलक्या सरी कोसळत आहेत. भोपाळचे हवामान तज्ज्ञ एसएन साहू यांनी सांगितले की, नैऋत्य मोसमी पाऊस कर्नाटकात पुढे सरकला आहे. वातावरणात आर्द्रता आल्यानं राज्यातही पावसाळी ढग तयार झाले आहेत. जेव्हा ते ढग बाजूला होतात, तेव्हा तापमान देखील वेगाने वाढू लागते. बुधवारी भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये कमाल तापमानात वाढ झाली, तर इंदूर आणि जबलपूरमध्ये दिवसाच्या तापमानात वाढ झाली नाही.

कोकणात लवकरच पावसाची एंट्री

विशेष म्हणजे महाराष्ट्रात 7 ते 10 जूनपर्यंत पावसाची एंट्री होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 9 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर फारसा सक्रिय नसलेला पाऊस 10 ते 16 जूनच्या आठवड्यात पश्चिम किनारपट्टीत दाखल होईल. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा काही भागांतही मान्सून कोसळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये मान्सून जूनच्या शेवटापर्यंत दाखल होणार असला तरी कोकणाशिवाय उर्वरित महाराष्ट्रात पाऊस जोर धरण्याची शक्यता नाही. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या सरींचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी शुक्रवारी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच रविवार, सोमवारी अहमदनगर, पुणे, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादेत रिमझिम पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.


हेही वाचाः जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू

First Published on: June 3, 2022 8:58 AM
Exit mobile version