खासदार अनिल देसाई यांची स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी निवड

खासदार अनिल देसाई यांची स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी निवड

Anil Desai

मुंबईः शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांची स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना वाढवण्यात स्थानीय लोकाधिकार समितीचा मोलाचा वाटा आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या विविध आस्थापनांतील लोकाधिकार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक शिवसेना भवन येथे काल सायंकाळी घेतली होती. त्या बैठकीत खासदार अनिल देसाई यांची स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

शिवसेना भवनातील बैठक शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंतांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीतच खासदार अरविंद सावंतांनी अनिल देसाई यांची महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आलाय. त्या बैठकीला महासंघाचे उपाध्यक्ष चंदूमामा वैद्य, प्रदीप मयेकर, आमदार सुनील शिंदे, आरबीआय लोकाधिकार समितीचे अजित सुभेदार, महासंघाचे चिटणीस वामन भोसले हे नेते उपस्थित होते.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने शिवसेनेच्या जडणघडणीत आणि पक्षकार्यातही अमूल्य योगदान दिले आहे. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यात लोकाधिकारचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी असतात. अनिल देसाई यांनी गेली अनेक वर्षे लोकाधिकार महासंघाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली होती. लोकप्रतिनिधी या नात्याने ते संसदेतही जनसामान्यांचे आणि मराठी माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडत असतात. शिवसेना नेते सुधीर जोशींच्या नेतृत्वाखाली महासंघाने अल्प कालावधीत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळेच सरकारी कार्यालयांमध्ये मराठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

प्रत्येक कार्यालयामध्ये स्थानीय लोकाधिकार समित्यांची स्थापना केली गेल्याने तिथे मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटू लागली आहे. मराठी माणसाला न्याय मिळू लागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारी आस्थापनांमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढावा, यासाठीच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची स्थापना झाली. आताही ही समिती आपल्या कार्यात अग्रेसर आहे. तसेच अनेक मराठी तरुणांना लोकाधिकार समितीच्या माध्यमातून नोकऱ्याही मिळाल्या आहेत.


हेही वाचाः आला थंडीचा महिना! राज्यात हुडहुडी वाढली, तर ‘या’ भागात पावसाचा अंदाज

First Published on: November 14, 2022 10:22 AM
Exit mobile version