नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकर, विक्रम भावेंना अखेर अटक

नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकर, विक्रम भावेंना अखेर अटक

डॉ. नरेंद्र दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली आहे. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकील संजीव पुनाळकर आणि विक्रम भावे हे आरोपी असून यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत. तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत.

संजीव पुनाळेकर हे सनातन संस्थेचे वकील असून दाभोलकर हत्याप्रकरणात ते मुंबई मुंबई उच्च न्यायालयात सनातनची बाजू मांडत आहेत. तसेच, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींच्या जबानीतून देखील पुनाळेकरांचे नाव समोर आले होते. तर विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.

सीबीआयची मोठी कारवाई

अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यासारख्या अनिष्ट रुढी परंपरांविरुद्ध लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून राज्य पोलीस आणि सीबीआयचे पथक तपास करत होते. मात्र पाच वर्ष या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नव्हती. खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने देखील ‘या प्रकरणात चालढकल का केली जात आहे?’ असा खरमरीत सवास सीबीआयला केला होता. या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून आज करण्यात आलेली कारवाई हे या प्रकरणाच्या तपासातलं मोठं यश म्हटलं जात आहे. मागील वर्षी सीबीआयने सचिन प्रकाशराव अंदुरे याला अटक देखील केली होती. तर नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचे नाव समोर आले होते. सचिन आणि शरद दोघे मित्र असून एटीएसने औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले आहे. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले.

सनातननं केला अटके निषेध!

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सीबीआयने हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना केलेली अटक निषेधार्ह आहे. केंद्रात हिंदुत्ववादी शासन सत्तारूढ असतांना अधिवक्ता पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक होणे, यामागे षडयंत्र आहे. सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे. मालेगाव स्फोटप्रकरणी भगवा आतंकवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला, ज्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक याचिका केल्या, त्या अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर आहे. पुनाळेकर निर्दोष आहेत’, अशी भूमिका सनातन संस्थेने जाहीर निवेदन काढून त्यात मांडली आहे.


वाचा – अंदुरे, कळसकर यांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या

वाचा – नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत आणखी दोघांचा सहभाग – सीबीआय


 

First Published on: May 25, 2019 7:50 PM
Exit mobile version