मुंबईत लष्कराची गरज नाही

मुंबईत लष्कराची गरज नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेली असून लवकरच या शहरात लष्कर बोलावणार, अशी जोरदार चर्चा आहे. या चर्चेचे जोरदार खंडन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लष्कर बोलावण्याची गरज नाही. अफवांवर कुणी विश्वास ठेऊ नये, असे स्पष्टीकरण दिले.

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशी एक अफवा पसरली आहे. लष्कर कशाला पाहिजे? आत्तापर्यंत जे काही केले ते तुम्हाला सांगून करणार आणि तसेच करणार आहे. महाराष्ट्रातले सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत. करोनाचे संकट गंभीर असले तरीही सरकार खंबीर आहे हे विसरु नका, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.

’लॉकडाऊनचे काय करायचे? लॉकडाऊन वाढणार की कमी होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र लॉकडाऊनचे काय करायचे, हे आता लोकांनीच ठरवायचे आहे’, असे ठाकरे म्हणाले. लॉकडाऊन वाढवण्यात कुणालाही रस नाही, पण सरकारचा नाईलाज आहे. तुम्ही लॉकडाऊनचे बंधन जेवढे टाळाल, तेवढा करोनाचा फास वाढत जाईल. त्यामुळे पुढचा काही काळ आपल्याला शारिरीक अंतर ठेवूनच काढावा लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

करोना विषाणूचा संसर्ग आणि साखळी कायमचा संपवण्यासाठी आता आपण उपाययोजना घेणार आहोत. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात जास्तीत जास्त ग्रीन झोन कसे होतील, याचा प्रयत्न आपल्या सर्वांना करावा लागणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राने आतापर्यंत देशात सर्वाधिक करोनाच्या टेस्ट केलेल्या आहेत. एकट्या मुंबईने एक लाखाच्या आसपास टेस्ट झाल्या आहेत. तरीही मुंबईत अनेक रुग्णांचा मृत्यू झाला, त्याचे कारण म्हणजे अनेक रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांकडे आले होते. रुग्णांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर जर त्यांनी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधल्यास त्यांना वाचवता आले असते, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

औरंगाबाद येथे शुक्रवारी पहाटे घडलेली घटना दुःखद असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगून मजूरांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला. या घटनेमुळे मी मनातून व्यथित झालो आहे. स्थलांतरीत मजूरांना मी याआधीही सांगत आलो आहे की, तुम्ही नाउमेद होऊ नका. महाराष्ट्र तुमची सगळी सोय करत आहे. तुम्हाला मूळ राज्यात जाण्यासाठी राज्य मदत करेल. त्यामुळे परराज्यातील मजूरांनी सयंम ठेवावा, चिंता करु नये, महाराष्ट्र सरकार तुमच्याबाजूने आहे, असा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मजूरांना धीर दिला.

औरंगाबाद घटनेवर ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले. ’औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी मनातून दुःखी झालो आहे. जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघाले आहेत आपण त्यांना आजही सांगतो आहे की राज्य सरकार तुमच्यासोबत आहे. इतर राज्यातल्या सुमारे सहा लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत. इतर राज्यातही ट्रेन सुरु करुन केंद्र सरकार, आपलं राज्य आणि ज्या राज्यात त्या मजुरांना जायचं तिथल्या सरकारसोबत बोलणी करुन मजुरांना पाठवण्यात येतं आहे. या सगळ्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला त्रस्त होण्याचं कारण नाही. तुम्ही थोडासा संयम बाळगा आम्ही तुमच्यासोबत आहोत’.

सायन हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांचा मृतदेह उघड्यावर ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतोच. मात्र डॉक्टर जर चुकीचे काम करणार असतील तर डॉक्टरांनादेखील आम्ही सोडणार नाही. त्यांच्यावर देखील कारवाई करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

गुरुवारी एक चांगली गोष्ट झाली, महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठक झाली. सगळ्यांना आम्ही काय करतो आहोत त्याची कल्पना दिली गेली. त्यांच्याकडून सूचना घेण्यात आल्या. मला एका गोष्टीबद्दल समाधान आहे की सगळ्यांनी खूप चांगल्या सूचना दिल्या. महाराष्ट्रातले सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी दुणावला असेही ठाकरे म्हणाले.

First Published on: May 9, 2020 7:15 AM
Exit mobile version