मुंबई पोलीस एक टीम, सिंघम…; देवेन भारती यांचा ट्विट करत सूचक इशारा

मुंबई पोलीस एक टीम, सिंघम…; देवेन भारती यांचा ट्विट करत सूचक इशारा

मुंबई : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारलाय. विशेष म्हणजे त्यांनी आज एक ट्विटही केलंय, त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई पोलीस एक टीम आहे. सिंघम अस्तित्वात नाहीत, अशा आशयाचं ट्विट देवेन भारती यांनी केलंय.

खरं तर आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बुधवारी गृह विभागाने मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केलीय. हे खास पद नव्यानेच तयार करण्यात आले आहे. हे पद अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखालील पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करता यावे म्हणून हे पद तयार केल्याचे गृह विभागाने शासन आदेशात स्पष्ट केले आहे.


याचाच अर्थ मुंबईचे पाचही सह आयुक्त यापुढे थेट मुंबई आयुक्तांना रिपोर्टिंग न करता विशेष पोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करतील. मुंबई पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांमधील फळीत हे नवे पद तयार करून गृह विभागाने एका अर्थाने मुंबई पोलीस आयुक्तांची शक्ती काढून घेत विशेष पोलीस आयुक्तांना सुपर कॉप बनवले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात हे पद प्रभावी ठरणार आहे. त्यानंतर आता देवेन भारती यांनी आज ट्विट करत सिंघम अस्तित्वात नसल्याचं सांगितलंय. त्यामुळेच त्यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वात पॉवरफूल अधिकारी होते. त्यावेळी देवेन भारती हे मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते, परंतु ठाकरे सरकारमध्ये 3 सप्टेंबर 2020 ला देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली करण्यात आली होती, मात्र त्यांना नवीन पोस्टिंग न दिल्याने ते त्याच पदावर 9 ऑक्टोबरपर्यंत सव्वा महिने कार्यरत होते. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. यांच्या आस्थापनेवरील संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी या अपर पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली होती.


हेही वाचाः देवेन भारती आता मुंबईचे ‘सुपर कमिश्नर’, गृहखात्यावर फडणवीसांचेच नियंत्रण

First Published on: January 5, 2023 5:10 PM
Exit mobile version