देवेन भारती आता मुंबईचे ‘सुपर कमिश्नर’, गृहखात्यावर फडणवीसांचेच नियंत्रण

देवेन भारती हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील अधिकार्‍यांपैकी सर्वात जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडे मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवल्याचे म्हटले जात आहे

मुंबई : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बुधवारी गृह विभागाने मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. हे खास पद नव्यानेच तयार करण्यात आले आहे. हे पद अपर पोलीस महासंचालक दर्जाचे असेल. मुंंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखालील पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करता यावे म्हणून हे पद तयार केल्याचे गृह विभागाने शासन आदेशात स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ मुंबईचे पाचही सह आयुक्त यापुढे थेट मुंबई आयुक्तांना रिपोर्टिंग न करता विशेष पोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करतील. मुंबई पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांमधील फळीत हे नवे पद तयार करून गृह विभागाने एका अर्थाने मुंबई पोलीस आयुक्तांची शक्ती काढून घेत विशेष पोलीस आयुक्तांना सुपर कॉप बनवले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात हे पद प्रभावी ठरणार आहे.

देवेन भारती हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील अधिकार्‍यांपैकी सर्वात जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडे मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) कलम 22 अन्वये शासनास प्राप्त अधिकारांतर्गत हे विशेष पद तयार करण्यात आले आहे. त्यानुसार विशेष पोलीस आयुक्त, हे पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखालील सर्व पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करतील. म्हणजेच मुंबईतील सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), सह पोलीस आयुक्त (प्रशासन), सह पोलीस आयुक्त (गुन्हे), सह पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) आणि सह पोलीस आयुक्त (वाहतूक) हे पाचही सह पोलीस आयुक्त यापुढे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना रिपोर्टिंग करतील. या अधिकार्‍यांचा कंट्रोल देवेन भारती यांच्याकडे राहणार असल्याने देवेन भारती मुंबई पोलीस दलातील सुपर कॉप ठरणार आहेत.

देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वात पॉवरफूल अधिकारी होते. त्यावेळी देवेन भारती हे मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते, परंतु ठाकरे सरकारमध्ये 3 सप्टेंबर 2020 ला देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली करण्यात आली होती, मात्र त्यांना नवीन पोस्टिंग न दिल्याने ते त्याच पदावर 9 ऑक्टोबरपर्यंत सव्वा महिने कार्यरत होते. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. यांच्या आस्थापनेवरील संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी या अपर पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली होती.

गृह विभागाने १३ डिसेंबराला पोलीस बदल्यांचे आदेश जारी करताना भारती यांच्याजागी राजवर्धन यांची नियुक्ती केली. त्यामुळे भारती यांच्यासाठी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त पद निर्माण करून तेथे त्यांची वर्णी लावली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारती यांच्या नव्या नियुक्तीचा आदेश गृह विभागाने बुधवारी जारी करून भारती यांच्याविषयीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. मुंबई पोलीस आयुक्त अखत्यारीतील पाचही सहपोलीस आयुक्तांच्या बदल्या करीत तेथे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील नवीन अधिकार्‍यांना नेमले.आता देवेन भारती यांच्यासाठी नवीन पदाची निर्मिती करून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पोलीस दलावर पूर्ण कंट्रोल ठेवला आहे.

विशेष एसआयटी चौकशीची जबाबदारी
हिवाळी अधिवेशनात सत्ताधार्‍यांकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर विशेष एसआयटीमार्फत या प्रकरणाचा तपास करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. पाठोपाठ अमरावती येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणी राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आल्यावर आवश्यकता असल्यास उद्धव ठाकरेंनी पोलीस आयुक्तांना केलेल्या फोनचीही चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन शंभूराज देसाईंनी विधानसभेत दिले होते. ठाकरे पिता-पुत्रांसाठी अडचणीच्या ठरणार्‍या या चौकशीची जबाबदारी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे सोपवण्यात येईल, असे म्हटले जात आहे.


हेही वाचाः धनंजय मुंडे उपचारासाठी एअर अँब्युलन्सने मुंबईत, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल