कोरोनामुक्त झालेले भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा कोरोनाची बाधा

कोरोनामुक्त झालेले भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा कोरोनाची बाधा

नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. मात्र, कोरोनावर मात करुन देखील अनेक जण पुन्हा बाधित होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती चिखलीकरांनी दिली आहे.

गेल्या महिन्यात ७ ऑगस्ट रोजी प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापूर्वी त्यांच्या मुलाची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. मात्र, त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले होते. तर महिन्याभरात प्रताप पाटील चिखलीकरांना कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे. ते सध्या दिल्लीतील निवासस्थानी वास्तव्यास असून ‘माझी प्रकृती उत्तम’ असल्याचे माहिती चिखलीकरांनी दिली आहे. दरम्यान मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अशोक चव्हाण (आमदार- भोकर, काँग्रेस), मोहन हंबर्डे (आमदार- नांदेड दक्षिण, कॉंग्रेस ), अमरनाथ राजूरकर (आमदार – विधानपरिषद, कॉंग्रेस), माधव जवळगावकर (आमदार- हदगाव, कॉंग्रेस), प्रवीण पाटील चिखलीकर (नांदेड जिल्हा परिषद सदस्य) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी देखील कोरोनावर मात केली आहे.


हेही वाचा – धक्कादायक! वेळेवर उपचार न घेतल्याने ८० टक्के मृत्यू; पालिकेकडून मृत्यूंचे विश्लेषण


 

First Published on: September 14, 2020 9:10 PM
Exit mobile version