वणी कार्यकारी सोसायटीतील १ कोटींच्या अपहार; गटसचिव, निरीक्षकावर संशय

वणी कार्यकारी सोसायटीतील १ कोटींच्या अपहार; गटसचिव, निरीक्षकावर संशय

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वणी कार्यकारणी सोसायटीत एक कोटी रुपयांचा अपहार झाल्याच्या वृत्ताला बँक अधिकार्‍यांनी दुजोरा दिला असून सोसायटीचा गट सचिव दत्तात्रय कोरडे आणि निरिक्षक तथा वसूली अधिकारी किशोर गांगुर्डे या दोघांनी संगनमताने हा अपहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अपहाराच्या निमित्ताने वणी कार्यकारी सोसायटीतील अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. या प्रकरणी गट सचिवांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच कार्यकारी सोसायट्यांमधील गटसचिवांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

जिल्हा उपनिबंधक सतिष खरे याला 30 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांचा विषय चर्चेत आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज पुरवठ्यानंतर त्याच्या वसूलीची जबाबदारी गट सचिव आणि संबंधित सोसायटीच्या निरिक्षकाची असते. गट सचिव हा सोसायटी आणि कर्जदारांमधील महत्वाचा दुवा असतो. अशा वेळी गट सचिवांच्या कामात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. परंतु बहुतेक ठिकाणी शाखाधिकारी किंवा सोसायट्यांच्या निरक्षकांना सोबत घेवून संगनमताने सचिव मंडळी पैशांचा अपहार करत असल्याचे पुढे आले आहे.

वणी कार्यकारी सोसाटीत गट सचिव दत्तात्रय कोरडे आणि निरीक्षक तथा वसूली अधिकारी किशोर गांगुर्डे यांनी अनेक वेळा अनेक प्रकारची वादग्रस्त कामे केल्याचे उघड झाले असून कोरडे याने कर्जदारांकडून जमा केलेली रक्कम बँकेत भरलीच नाही. तसेच अनेक कर्जदारांना थेट ना हरकत दाखले दिले आहेत. प्रत्यक्षात कर्जदाराची रक्कम सोसायटीत भरलीच नाही. काही जणांच्या सात-बारा उतार्‍यावर कर्ज न घेताच बोजा चढविला आहे. कोरडे यांच्या कारनाम्यांमुळे परिसरातील कर्जदार तसेच सभासद हैराण झाले असून या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करुन कोरडे आणि गांगुर्डे यांच्यासह दोषी असलेल्यांविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

याप्रकरणात आम्ही कुठल्याही पैशाचा अपहार केलेला नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. : दत्तात्रय कोरडे, गटसचिव

वादग्रस्त कोरडेला खरेचा वरदहस्त

लाचखोर सतिष खरेच्या कार्यकाळात वणी कार्यकारी संस्थेच्या गैर कारभाराची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीचा अहवाल देखिल खरेला सादर करण्यात आला होता. त्यामध्ये 39 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. असे असतांना खरेने या प्रकरणी कठोर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे खरे याने वणी विकास संस्थेच्या कारभाराची चौकशी दाबून टाकली आणि सचिव दत्तात्रय कोरडे याला पाठीशी घातले. त्यामुळे कारवाई न झाल्याने कोरडेचे हिंमत वाढत गेली. त्यातूनच त्याने १ कोटी रुपयांचा अपहार केल्याची चर्चा होत आहे.

यात माझा कोणताही संबंध नसून, मी नियमाप्रमाणे कामकाज केले आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून, मी याबाबत आता काहीही सांगू शकत नाही. : किशोर गांगुर्डे, निरीक्षक तथा वसूली अधिकारी

First Published on: June 2, 2023 3:05 PM
Exit mobile version