गोपीनाथ मुंडे हे शिवसेना आणि भाजप युतीचे शिल्पकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गोपीनाथ मुंडे हे शिवसेना आणि भाजप युतीचे शिल्पकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासह डझनभर नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात जनतेला संबोधित करत गोपीनाथ मुंडेंना शिवसेना आणि भाजप युतीचे शिल्पकार असं म्हटलं आहे.

हे सरकार शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं

आजही पाऊस या कार्यक्रमाला आशीर्वाद द्यायला आला आहे. अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान होईल, तेवढी नुकसान भरपाई त्यांना दिली जाईल. कारण हे सरकार शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं आहे. तसेच मुंडेंच्या विचारांवर चालणारं हे सरकार आहे. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारा हा जनसागर आणि महासागर आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने मुंडेंना विनम्र अभिवादन करतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे हे शिवसेना आणि भाजप युतीचे शिल्पकार

शिवसेना आणि भाजपच्या युतीचे शिल्पकार गोपीनाथ मुंडे होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मुंडेंचं प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती. बाळासाहेब ठाकरेंच्या मनात देखील मुंडेंबद्दल एक मोठं प्रेम आणि विश्वास होता. त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. ३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत मुंडेंनी अनेक चढउतार पाहिले. त्यांच्या जीवनात काही चांगले दिवस आले तर संघर्षाचा काळही आला. जेव्हा संघर्षाचा काळ यायचा तेव्हा बाळासाहेब ठाकरे मुंडेंना मार्गदर्शन करायचे. गोपीनाथ मुंडेंचा वारसा पंकजा मुंडे पुढे घेऊन जात आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यात पक्ष वाढवण्याचं काम केलं

अनेक लोकनेते या राज्यामध्ये आपण पाहिले. त्यांनी अनेक चांगली कामं केली. त्यामुळे ते लोकनेते म्हणून प्रसिद्ध झाले. परंतु गोपीनाथ मुंडे हे या बिरुदाचे मुकुटमणी होते. त्यांनी सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. कधीही त्यांनी आडपडदा ठेवला नाही. थेट आणि परखडपणे बोलणारे तसेच सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला. ७०च्या दशकात त्यांनी सायकलवर शबनमची झोळी गळ्यात अडकवून प्रसंगी, पायी प्रवास करून राज्यात भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम केलं.

आजही कोणतंही शुभकार्य असो किंवा लग्न समारंभ आपण देवासमोर पहिली पत्रिका ठेवतो. ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. पण आजही गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारी जनता कुठल्याही लग्नाच्या शुभकार्याची पत्रिका गोपीनाथ गडावर नेऊन ठेवतात. ही एक श्रद्धा, प्रेम आणि विश्वास आहे.

राजकारणातला पट बदलून टाकणारं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे

माणसाला आपलं करून घेण्याची आणि जोडण्याची ताकद मुंडेंमध्ये होती. ही गोष्ट त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखी आहे. अठरा पगड जातीवर प्रेम करण्याचं काम मुंडेंनी केलं. मुंडेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांची संघर्ष यात्राही आपण पाहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला पट बदलून टाकणारं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे आहेत, असंही शिंदे म्हणाले.


हेही वाचा : शिंदे गटाला विधानसभेच्या ४८ जागा मिळतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वादग्रस्त


 

First Published on: March 18, 2023 3:24 PM
Exit mobile version