दारु पाजून महिलेवर बलात्कार

दारु पाजून महिलेवर बलात्कार

दुर्गम व आदिवासी भागातून रोजगाराच्या शोधार्थ नाशिकमध्ये आलेल्या ३५ वर्षीय महिलेस बळजबरीने दारु पाजत चाकू दाखवत व पती व मुलांना मारुन टाकण्याची धमकी देत नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी नराधमास अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नागजीभाई काकड चौधरी (४५, मूळ रा.मोठी पळसन, जि.बलसाड, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आदिवासी भागातून रोजगाराच्या शोधार्थ पीडित महिला पती व मुलांसह पंचवटीमध्ये राहण्यास आली. ती गंवडी नागजीभाई चौधरी याच्यासोबत गंवडी काम करु लागली. सोमवारी (दि.१०) रात्री १० वाजेच्या दरम्यान तो महिलेच्या घरात बळजबरीने घुसला. दारुच्या नशेत त्याने बळजबरीने पीडित महिलेला दारु पाजली. त्यानंतर तिला चाकू दाखवत पती व मुलांना मारुन टाकीन, अशी धमकी देत त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने आपबिती पतीला सांगितली असता पतीने तिला धीर देत पंचवटी पोलीस ठाण्यात आणले. पीडितेने पोलीस ठाण्यात चौधरीविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौधरी यास अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जी. एम. जाधव करत आहेत.

First Published on: February 18, 2020 8:08 PM
Exit mobile version