Lok Sabha 2024 : भुजबळांनी नाशिकमधून माघार घेताच हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

Lok Sabha 2024 : भुजबळांनी नाशिकमधून माघार घेताच हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

नाशिकची उमेदवारी कोणाला? छगन भुजबळ, हेमंत गोडसे मुंबईला रवाना

नाशिक : लोकसभा निवडणूक 2024च्या पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. नाशिकमधून शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तिघांना दावा केला होता. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचेही नाव समोर आले होते. मात्र आज त्यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच महायुतीने उमेदवार लवकर जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत गोंडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (Lok Sabha Election 2024 Chhagan Bhujbal withdraws from Nashik constituency Hemant Godse Eknath Shinde)

हेमंत गोंडसे म्हणाले की, नाशिकमधून लोकसभा लढवण्यासाठी छगन भुजबळ यांना केंद्रातील नेत्यांनी आग्रह धरला होता. मात्र, त्यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून आता माघार घेतली आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. भुजबळ यांच्या निर्णयानंतर या जागेसाठी असणारा महायुतीचा तिढा लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा आहे. ही जागा कोणत्या पक्षाला सुटेल, याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा आणि उमेदवार जाहीर करावा, असे आवाहन हेमंत गोडसे यांनी केले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील पाचपैकी दोन उमेदवार चढणार पहिल्यांदाच संसदेची पायरी

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाशिकच्या जागेवर छगन भुजबळ उभे राहतील असं सांगितलं. शिंदेंनी आमची जागा असल्याचं सांगितलं, पण भुजबळ तिथे उभे राहतील असं दिल्लीतून सागंण्यात आलं. अजित पवार यांनीही हट्ट धरला तुम्हाला लढावं लागेल. त्यानंतर पहिल्या आठवड्यात उमेदवारी जाहीर व्हायला हवी होती. पण तीन आठवडे गेले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने तीन आठवड्यांपासून प्रचार सुरू केला आहे. मात्र महायुतीकडून अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही, अशी खंत छगन भुजबळ यांनी सांगितलं.

भुजबळ म्हणाले की, नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे जेवढा उशिर होईल, तेवढं नाशिकच्या जागेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे उमेदवारीबाबत ताबोडतोब निर्णय घेणं गरजेचं आहे. कोण जागा लढवणार, कोण उमेदवार असेल हे जाहीर करायला हवं, अन्यथा अडचण निर्माण होऊ शकते. प्रतिस्पर्धी कामाला लागले आहेत. त्यामुळे ही संदिग्धता आपण लवकर दूर करायला हवी. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की, मी नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेत आहे, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीचा सांगलीचा तिढा मिटणार; राऊत म्हणाले, विशाल पाटील आमचे…

दरम्यान, छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतल्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत गोंडसे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट आहे. कारण हेमंत गोंडसे यांनी नाशिकची जागा आपल्याला मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर शक्तीप्रदर्शन केलं होतं. भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हेमंत गोंडसे यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. याशिवाय त्यांनी महायुतीकडून नाशिकमध्ये उमेदवार जाहीर झालेला नसतानाही प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे आता भुजबळांनी माघार घेतल्यामुळे हेमंत गोंडसे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पण भाजपा पदाधिकारी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 19, 2024 5:36 PM
Exit mobile version