घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील पाचपैकी दोन उमेदवार चढणार पहिल्यांदाच संसदेची...

Lok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील पाचपैकी दोन उमेदवार चढणार पहिल्यांदाच संसदेची पायरी

Subscribe

चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर तसेच रामटेकमध्ये राजू पारवे आणि श्याम बर्वे यांच्यात लढत होत आहे. यामध्ये विजयी होणारा उमेदवार प्रथमच लोकसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतील.

मुंबई : लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेला आज, शुक्रवारपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक, चंद्रपूरसह देशभरातील 21 राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील 102 लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. राज्याचा विचार करता पाचपैकी दोन मतदारसंघातून विजयी होणारे उमेदवार पहिल्यांदाच लोकसभेची पायरी चढणार आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान खासदार नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. गडकरी यांना यावेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिल्याने या सरळ लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचा सामना काँग्रेसच्या प्रशांत पडोळे यांच्याशी होत आहे. वंचित बहुजन आघाडीने येथून संजय केवट यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान आणि भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यात मुख्य लढत आहे. वंचित बहुजन आघाडीने हितेश मडावी यांना रिंगणात उतरवले आहे. तर, चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात मुख्य लढत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्याम बर्वे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये अशी तिरंगी लढत आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सर्वत्र भाजप, महायुतीचे उमेदवार विजयी होतील – सुधीर मुनगंटीवार

- Advertisement -

या टप्प्यातील चंद्रपूरच्या जागेकडे सर्वांचे लक्ष आहे. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला चंद्रपूरची एकमेव जागा मिळाली होती. बाळू धानोरकर यांनी ही जागा राखली होती. परंतु बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार म्हणून तिकीट दिले आहे. ही जागा कायम राखण्याचे आव्हान काँग्रेस समोर आहे. तर, त्यांच्यासमोर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक रिंगणात आहेत. पण लोकसभा निवडणूक लढण्यास ते अनुत्सुक होते. तुमचे वजन वापरा आणि लोकसभेत जाण्याच्या भीतीतून मला मुक्त करा, असे आवाहन त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले होते. मात्र, तरीही पक्षाने त्यांना तिकीट दिले.

रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून शिंदे गटाने महायुतीचे उमेदवार म्हणून राजू पारवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तर, काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली होती, पण जातप्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. तिथे आता काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वे निवडणूक लढवित आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर रिंगणात उतरलेले किशोर गजभिये गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते.

नागपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या मतदारसंघात विद्यमान खासदार पुन्हा नशीब आजमावत आहेत, तर, रामटेक आणि चंद्रपूर या मतदारसंघात विजयी होणारे उमेदवार प्रथमच लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व करतील.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिभा धानोरकर भावूक; म्हणाल्या…


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -