गुन्हेगारांचा बायोडाटा बनवण्याचे काम सुरू, एका क्लिकवर समोर येणार सगळे कारनामे

गुन्हेगारांचा बायोडाटा बनवण्याचे काम सुरू, एका क्लिकवर समोर येणार सगळे कारनामे

नाशिक : शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी आता गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार करण्याचे काम सुरु केले आहे. दोन पेक्षा आधिक गुन्हे दाखल असलेल्या गुंडाची आधारकार्डासह माहिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, आजूबाजूचे वातावरण, स्थावर व जंगम मालमत्ता, त्याचे मित्र व आश्रयदात्यांची नावे याची माहिती गोळा केली जात असून, ही माहिती पोलिसांनी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. एखाद्या गंभीर गुन्ह्यात गुन्हेगाराचे नाव समजल्याचे उपलब्ध माहितीच्या आधारे त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कोयता विक्री करणार्‍यांसाठी स्वतंत्र मनाई आदेश काढत कोयत्यांवर नियंत्रण आणले. सध्या शहरातील क्राईम व अंतर्गत कुरबुरींवर नियंत्रण कसे मिळवता येईल, यासाठी आयुक्त हेडक्वार्टर व कंट्रोल रुमच्या जोरावर पॅटर्न राबवत आहेत. असे असताना शहरातील खून, जबरी लूट, प्राणघातक हल्ले, गावठी कट्टे, पिस्तूलांवर नियंत्रण आणण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करुन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवाळण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

शहरात वैयक्तिक वादातून सार्वजनिक ठिकाणी गंभीर दुखापतीचे हल्ले होत आहेत. हे हल्ले स्थानिक टोळी वा वैयक्तिक रागातू होत असल्याचे समोर आले आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी या सर्वच गुंडांची माहिती क्राईम ब्रान्च व स्थानिक पोलिस ठाण्यांनी संकलित केली जात आहे. संशयितांचे अभिलेख तयार होत असून एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील संशयितांची फुटकळ माहिती पोलिसांकडे असते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यास अडथळ्यांची शर्यत पार करावी लाागते. हीच शर्यत कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी आता दोन किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची माहिती अपडेट केली जात आहे.

आयुक्तालयाकडे बहुतांश हिस्ट्रीशीटरची नावे आहेत, मात्र, त्यात त्यांचा कायमचा पत्ता, आधारकार्ड, बँक खात्यांची माहिती, तसेच स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती नाही. सोबतच संशयिताची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, त्याचे आई, वडील, बहिण, भाऊ, नातलग व मित्र काय करतात, तो कोणाच्या संपर्कात असतो, याची माहिती अपडेट केली जात आहे. तसेच, गुन्हेगार कोणते मोबाईल वापरतो. त्यातील सीमकार्ड कोणते आहे. कोणत्या बँकेत खाते आहे. त्याचे कुटुंब काय करते, त्यांचा व्यवसाय काय आहे. तो कुणाच्या संपर्कात आहे. वापरणार्‍या वाहनांची माहिती, त्याची दिनचर्या काय आहे, याची माहिती पोलिसांनी मिळणार आहे.

First Published on: May 9, 2023 1:33 PM
Exit mobile version