राज्यपाल कशाची वाट बघतं होते हे आज कळलं; जयंत पाटलांची टोलेबाजी

राज्यपाल कशाची वाट बघतं होते हे आज कळलं; जयंत पाटलांची टोलेबाजी

महाराष्ट्र विधानसभेच्या दोन दिवशीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरु आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत सुरु आहे. या लढतीवरून अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना वारंवार भेटून अध्यक्षपदाच्या निवडीबाबत विनंती केली. मात्र राज्यपालांनी आमची विनंती मान्य का केली नाही, ते कशाची वाट बघतं होते ते आमच्या लक्षात आलं, अशा शब्दात जयंत पाटलांनी राज्यपाल आणि फडणवीस- शिंदे सरकारला टोला लगावला आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गेली अनेक महिने महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष निवडीची प्रतिक्षा होती. महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार विनंती करण्यात आली होती, आमच्यातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यपालांना भेटून वारंवार विनंती केली. मात्र राज्यपालांनी आमची विनंती मान्य केली नाही. ते कशाची वाट बघतं होते ते आमच्या लक्षात आलं, हे जर त्यांनी आधीच सांगितलं असतं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे यापूर्वीच केलं असतं. परंतु आता राज्यपालांनी ही मागणी मान्य केल्याने त्यांचे आभार… अशा शब्दात जयंत पाटलांनी राज्यपालांना चिमटा काढला आहे.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला आणि देशाला राज्यपाल कसा आदर्श घालू शकतो… हा आदर्श राज्यपालांनी घातला आहे. राज्यपालांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे, विधान परिषदेसाठी पाठवलेली 12 नाव आहेत ती आम्ही पाठवल्याप्रमाणे मान्य करावी. ते केल तर राज्यपाल सगळ्यांशी समान वागले असा संदेश देण्याची ही शेवटची संधी आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

फडणवीसांचा जयंत पाटलांना प्रत्युत्तर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून राज्यपालांना लागावलेल्या टोल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर  दिले आहे. यावर फडणवीस म्हणाले की, जयंत पाटलांनी राज्यपालांचे आभार मानले मी नाना पटोलेंचे आभार मानतो. त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. ते आमचे मित्रचं आहेत. मित्राचे कर्तव्य काय असते त्याला ते जागले म्हणून त्यांचेही आभार… राज्यातील काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यानंतर फेब्रुवारी 2021 पासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे.


…तर, आपण राज्याचे मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांना टोला

First Published on: July 3, 2022 12:00 PM
Exit mobile version