माथाडी कधी दबून राहात नसतो – अजित पवार

माथाडी कधी दबून राहात नसतो – अजित पवार

अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र गुरुवारी ज्येष्ठ माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या माथाडी कामगार मेळाव्यात नरेंद्र पाटील चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत एकाच मंचावर दिसून आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

माथाडींसाठीच भाजपमध्ये गेलो – पाटील

दरम्यान, पाटील यांनी यावेळी भाजप पक्षप्रवेश का केला? याचं कारण दिलं. माथाडी कामगारांसाठीच भाजपमध्ये गेल्याचं त्यांनी सांगितलं. ‘अजितदादा मी भाजपमध्ये गेलो. पण माझ्यासाठी नाही तर माथाडी कामगारांच्या भल्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सोबत गेलो,’ असं नरेंद्र पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

माथाडी कधी दबून राहात नाही – अजित पवार

यानंतर अजित पवार यांनी आपल्या भाषणात नरेंद्र पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘नरेंद्र, माथाडी कामगारांसाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहात. पण माझे एक सांगणे आहे, त्यांना दबून तुम्ही राहू नका. कारण माथाडी कधी दबून राहत नाही,’ असा सल्ला अजित पवारांनी नरेंद्र पाटील यांना दिला. यावेळी दोन्ही नेत्यांच्या भाषणात शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली.

शरीराने भाजप, मनाने राष्ट्रवादीच!

नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेत आमदार होते. मात्र पक्षाकडून पुन्हा संधी न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपची वाट धरली. भाजपनेही त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे स्वागत केले. मात्र आजच्या त्यांच्या भाषणावरून नरेंद्र पाटील हे शरीराने जरी भाजपमध्ये असले तरी मनाने राष्ट्रवादीतच असल्याचं दिसून आलं आहे.


हेही वाचा – ट्राफिकला कंटाळून अजित पवारांनी पकडली ‘डोंबिवली फास्ट’!
First Published on: December 27, 2018 9:11 PM
Exit mobile version