लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का?, राष्ट्रवादीचा सवाल

लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का?, राष्ट्रवादीचा सवाल

लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का?, राष्ट्रवादीचा सवाल

लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारने उंटावरून शेळ्या हाकू नये अशी जोरदार टिका राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी गुरुवारी पीएम केअर फंडातून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची पाहणी केली होती. यावेळी पीएम केअर फंडातून घाटी रूग्णालयाला १५० व्हेंटिलेटर देण्यात आले. मात्र हे व्हेंटिलेटर निकृष्ट असून कोरोना रूग्णांच्या वापरायोग्य नाहीत, आयसीयू कक्षात लावण्याच्या दर्जाचे नाहीत असा स्पष्ट अहवाल घाटी रूग्णालयातील यासंदर्भात नियुक्त केलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिला होता.

या महत्त्वपूर्ण विषयाला आमदार सतीश चव्हाण यांनी गुरुवारी पुराव्यानिशी वाचा फोडल्यानंतर माध्यमांनी दखल घेतली. दरम्यान माध्यमातून आलेल्या माहितीनुसार केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाला दखल घ्यावी लागली आणि यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी प्रेस नोट प्रसिध्द करून औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयातील व्हेंटिलेटर संदर्भात प्रसिध्द झालेल्या बातम्या निराधार, चुकीच्या असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने प्रत्यक्ष व्हेंटिलेटरची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला असताना घाटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल खोटा की केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेली प्रेस नोट खोटी? असा सवाल आमदार सतीश चव्हाण यांनी आज उपस्थित केला आहे.

पीएम केअर फंडातून औरंगाबादला दिलेले व्हेंटिलेटर बिनकामाचे निघालेत असे नाही तर पंजाब, राजस्थान या राज्यांना पीएम केअर फंडातून देण्यात आलेली व्हेंटिलेटरही सदोष व बिनकामाचे निघालेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील सदोष व्हेंटिलेटर पुरविल्याच्या या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकार गुजराती कंपनीवर मेहेरनजर

निकृष्ट व्हेंटिलेटर देऊन केंद्रसरकार याकडे दुर्लक्ष करत गुजराती कंपनीवर मेहेरनजर का होत आहे? मेक इन इंडियाच्या नावाखाली लोकांचे जीव घेणार आहे का? असे अनेक सवाल आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रसरकारला विचारले आहेत. मराठवाड्यात ज्या- ज्या ठिकाणी हे पीएम केअरचे व्हेंटिलेटर पुरविण्यात आले त्याठिकाणी लवकरच भेट देऊन किती व्हेंटिलेटर उपयोगात आले आणि किती बिनकामाचे निघालेत याची माहिती घेणार असल्याचेही आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले आहे.

देशातील कोविडच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. पीएम केअर फंडातून अनेक राज्यांना दिलेले व्हेंटिलेटर बिनकामाचे असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मोदी यांनी या घटनेची दखल घेत औरंगाबादसह इतर राज्यांना पीएम केअर फंडातून दिलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याच्या सुचना आरोग्य यंत्रणेला दिल्या असल्याचे समजते. या गंभीर घटनेची दखल घेतल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. शिवाय यातून भाजपच्या नेत्यांनी योग्य तो बोध घेतला तर राज्यसरकारवर उठसुठ टीका करण्याची सुबुद्धी सूचणार नाही असा टोलाही आमदार सतीश चव्हाण यांनी लगावला आहे.

First Published on: May 15, 2021 9:26 PM
Exit mobile version