उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूरची निवडणूक राष्ट्रवादी लढविणार

उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूरची निवडणूक राष्ट्रवादी लढविणार

येत्या दोन वर्षात होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. या तिन्ही राज्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि छोट्या मोठ्या पक्षांना बरोबर घेऊन आघाडी करून लढणार असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली. विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये सत्तापरिवर्तन होईल, असा विश्वासही पवार यांनी केला.

मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. त्यामुळे यावेळी पाच जागा राष्ट्रवादी लढणार आहे. गोव्यामध्ये काँग्रेस, तृणमूल आणि इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. तर पुढच्या आठवड्यात आपण स्वतः उत्तर प्रदेशात जाणार असून तेथे समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या – मोठ्या पक्षांशी आघाडी झाली आहे. यासंदर्भात आज, बुधवारी लखनऊमध्ये आघाडीतील पक्षांची बैठक होणार असून या बैठकीत जागावाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

आमच्या बाजूने ८० टक्के लोक आहेत तर २० टक्के लोक नाहीत, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. या विधानाचा पवार यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री हा सर्वांचा असतो. २० टक्के लोक बाजूने नाहीत हे विधान अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवणारे आहे. अशाप्रकारचे विधान मुख्यमंत्रीपदाला शोभा देणारे नाही. पण त्यांच्या जे मनात आहे, ते त्यांच्या ओठावर आले आहे. यातून एक गोष्ट सिद्ध होते की, देशात एकता आणि सहिष्णुता टिकवायची असेल तर अशाप्रकारचे सांप्रदायिक विचार वाढणे योग्य नाही. याविरोधात उत्तर प्रदेशची जनता नक्कीच कौल देईल आणि राज्यात परिवर्तन घडवेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

आजच्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे अल्पसंख्याक समाजातील नेते सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. आज उत्तर प्रदेशच्या स्थितीमध्ये खूप बदल झाला आहे. मला आनंद आहे की, जे उत्तर प्रदेशच्या विधानपरिषदेचे सदस्य होते. मागच्या अनेक वर्षांपासून गांधी-नेहरू यांच्या विचारधारेवर काम केले आहे. काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आता राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना सोबत घेऊन उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले.

गोव्यात महाविकास आघाडीची शक्यता
गोव्यात भाजपचे सरकार हटवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन गोव्यात महाराष्ट्रासारखी आघाडी होऊ शकते. काँग्रेसचे धोरण अजून कळले नाही, पण आमचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या सुरक्षेचे राजकारण चुकीचे
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौर्‍यातील सुरक्षेच्या मुद्यावरून सुरू असलेल्या आरोपाबाबत बोलताना पवार यांनी, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशीतून सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधानपद ही एक संस्था आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र आणि राज्याने घेतली पाहिजे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होणे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले.

एसटी संपात मध्यस्थी केली तर चुकीचे काय?
एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्यासह बैठक घेतली होती. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. याबाबत विचारता, राम कदम यांच्या ज्ञानाबद्दल कौतुक वाटते, असा टोला पवार यांनी लगावला. एखाद्या कामगार संघटनेने मला बोलावले, आणखी कुणाला बोलावले तर लोकशाहीत त्यांच्याशी चर्चा करण्याचा अधिकार आहे की नाही? या अधिकाराने चर्चा केली असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. मुख्यमंत्री हेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना बैठकीला प्रत्यक्ष हजर राहता आले नाही. परंतु परिवहन मंत्र्यांनी जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली असणार. शेवटी धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री एकत्रित विचारानेच घेतात,असे शरद पवार यांनी सांगितले.

First Published on: January 12, 2022 6:00 AM
Exit mobile version