विधानभवनात आता कागदी कपातून चहा, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर नीलम गोऱ्हेंचे निर्देश

विधानभवनात आता कागदी कपातून चहा, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर नीलम गोऱ्हेंचे निर्देश

नागपूर – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांची गैरसोय होत असल्याचं समोर आलं आहे. स्वच्छतागृहात चहाचे कप धुण्यात येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरुन विधान परिषदेत आमदार अमोल मिटकरी यांनी मुद्दा मांडला असता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. यापुढे चहा पिण्यासाठी काचेचा कप न वापरता मध्यम आकाराचे कागदी कप वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विधान भवनात स्वच्छतागृहातील नळावर चहा पिण्याचे कपबशा धुण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विधिमंडळातील सदस्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विधिमंडळातील सदस्यांच्या आरोग्याबाबत अशाप्रकारे हलगर्जीपणा केला जात आहे, यावरून अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. तसंच, स्वच्छतागृहात कपबशा धुतले गेल्याचा व्हिडीओही मिटकरींनी विधान परिषदेत पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सादर केला. यावरून नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

यापुढे मध्यम आकाराच्या कागदी कपातून चहा देण्याचे निर्देश मी संबंधित कंत्राटदाराला देणार आहे. तसंच, स्वच्छतागृहात कपबशा धुण्यात आल्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचेही आदेश देण्यात येतील, असं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.


विधानसभेतही पडसाद

दरम्यान, आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली. पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही, सरकारचे लक्ष नाही, सरकारचे लक्ष आहे कुठे असा सवाल अजित पवार यांनी केला. या घटनेला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

First Published on: December 22, 2022 1:12 PM
Exit mobile version