पोपटाच्या शिट्ट्यांनी शेजारी हैराण, मालकाविरोधातच थेट गुन्हा दाखल

पोपटाच्या शिट्ट्यांनी शेजारी हैराण, मालकाविरोधातच थेट गुन्हा दाखल

पुणेः पोपट तसा सगळ्यांच्याच आवडता पक्षी आहे. हिरव्यागर्द झाडावर बसलेला पोपट हा आपल्याला सदोदित आकर्षित करतो. त्यामुळेच अनेकांना घरात पोपट पाळण्याचीही हौस असते, परंतु पोपट पाळण्यास वन विभागाच्या कायद्यांतर्गत बंदी आहे. आता पुण्यातही पोपटासंदर्भात अशीच एक विचित्र घटना घडलीय. पोपट सारखा सारखा शिट्ट्या मारतो म्हणून त्याच्या मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोपट शेजाऱ्यांना त्रास देत असल्याचंही सांगण्यात येत आहे.

पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात हा सगळा प्रकार घडला असून, आता आजूबाजूच्या भागात या पोपटाच्या त्रासाचीच चर्चा आहे. पोपटाचा मालक असलेल्या अकबर अमजद खान याच्याविरोधात शेजारी राहणाऱ्या सुरेश शिंदे यांनी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवला आहे. अकबर अमजद खान यांचा पोपट त्यांच्याच परिसरात राहणारे सुरेश शिंदे यांना पाहिल्यानंतर शिट्ट्या मारत होता. तसेच ते रात्री झोपल्यानंतर मध्येच किंवा एकदम पहाटे जोरजोरात शिट्ट्या मारत होता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या सुरेश शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाची झोप मोड होत होती.

प्रत्येक वेळी शिंदे घरात असताना तो पोपट वारंवार जोरजोरात शिट्ट्या मारायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून शिंदे यांनी खान यांना तुमचा पोपट झोपमोड करत असल्याचं बजावून सांगितलं, तुम्ही त्याला इकडे ठेवू नका, असंही म्हटलं. पण त्यानंतरही खान यांनी शिंदे यांचं काही एक ऐकलं नाही. शेवटी कंटाळून सुरेश शिंदेंनी पोपटाचे मालक अमजद खान यांच्याविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आता गुन्हा नोंदवून घेतला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. खरं तर कायद्यानं पोपट पाळण्यासही मज्जाव आहे. त्यामुळे आता खडकी पोलीस कारवाई करणार की वन विभागाला यासंदर्भात कळवणार हे लवकरच समजणार आहे.


हेही वाचाः कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणार, नीती आयोगातील बैठकीनंतर शिंदेंची माहिती

First Published on: August 7, 2022 6:16 PM
Exit mobile version