सानपाड्यातील ‘त्या’ मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

सानपाड्यातील ‘त्या’ मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राज्यभरात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू अस वक्तव्य केलं होतं. त्याशिवाय, राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर आता विविध संघटना त्यांना पाठिंबा देत आहेत. अशातच आता नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात असलेल्या सिडकोनं मशिदीसाठी जागा राखीव ठेवली आहे. मात्र आता अखिल भारतीय सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठाननं मशिदीला विरोध करत मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

मनसेने आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणं नवी मुंबई सानपाडा मशिदीसाठी सिडकोकडून देण्यात आलेला भूखंड रद्द करावा, सानपाडावासियांच्या न्यायालयीन लढ्याला मनसेचा पूर्ण पाठिंबा तसेच वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळं राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज यांनी दिले. राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

५ जूनला राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली जाणार आहे. त्याची जबाबदारी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंकडे सोपवण्यात आली आहे. यासाठी १० ते १२ ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार आहे. याशिवाय राज यांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिण्यात आले आहे.


हेही वाचा – अक्षय्य तृतियेला राज्यभर महाआरती करा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

First Published on: April 19, 2022 4:03 PM
Exit mobile version