पावभाजी, पाणीपुरीच्या आकारातील राख्यांची भुरळ

पावभाजी, पाणीपुरीच्या आकारातील राख्यांची भुरळ

प्रमोद उगले। नाशिक

लहान मुलांमध्ये दरवर्षी कार्टून राख्यांची क्रेझ असते. या राख्यांसाठी लहान मुले भरबाजारात आई-वडिलांकडे हट्ट करतानाही दिसतात. मात्र, यंदा या बच्चेकंपनीला नव्याने बाजारात आलेल्या फूड राख्यांची भुरळ पडली आहे. या राख्यांमध्ये पावभाजी, पाणीपुरी, ढोकळा, इडली, डोसा अशा अनेक पदार्थासारख्या दिसणार्‍या राख्यांचा समावेश आहे.
भावाबहिणीच्या अतूट नात्याचं महत्त्व सांगणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

याच पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या सणावर कोरोनाचे सावट होते. परंतु, या वर्षी सरकारने सर्व निर्बंध हटवल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आपल्या भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी होऊ लागली आहे. पूर्वीच्या काळात प्रवासाची साधने अत्यंत मोजकी अल्यामुळे बहीण आपल्या भावापर्यंत राखी पाठवण्यासाठी टपालाची मदत घ्यायची. मात्र, आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे व्हर्च्युअल राखीरुपी भावना एका सेकंदात जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात पोहोचतात. तर, स्पीड पोस्टमुळे पाठवलेली राखीदेखील वेळेत भावाला मिळते.

यंदा बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. बच्चे कंपनीसाठीही हटके राख्या आहेत. त्यात छोटा भीम, डोरेमॉन यांसोबतच खाद्यपदार्थांसारख्या दिसणार्‍या राख्यांचीही क्रेझ आहे. शहरातील मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा भागात या राख्यांची दुकाने सजली आहेत. राख्यांच्या विक्रीतून दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे व्यापार्‍यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

First Published on: August 2, 2022 1:06 PM
Exit mobile version