दुःखद बातमी; मुंबईत कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू

दुःखद बातमी; मुंबईत कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांप्रमाणेच अहोरात्र सेवा देणार्‍या पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील ५७ वर्षीय कोरोनाबाधित कॉन्स्टेबल चंद्रकांत गणपत पेंदुरकर यांचे शनिवारी नायर रुग्णालयात निधन झाले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत ९६ पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बाधित झालेल्या पोलिसांपैकी प्रथमच एका आपल्या सहकार्‍याचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

 

मुंबईत कोरोनामुळे पोलिसाचा झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. वाकोला येथे ड्युटीवर असलेल्या पेंदुरकर यांना २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पेंदुरकर हे वरळी नाका येथे वास्तव्याला होते. त्यांचे मुळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.

हे वाचा – धक्कादायक, राज्यातील ९६ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात पोलीस दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस सेवा बजावत आहेत. त्यातून या पोलिसांनाही कोरोनाने गाठले असून आतापर्यंत राज्यात ९६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यात १५ पोलीस अधिकार्‍यांचाही समावेश आहे. त्यात आता करोनाची लागण होऊन मुंबईत पोलिसाचा मृत्यू झाल्याने पोलीस दल हादरलं आहे.

राज्यात ९५७ रुग्ण बरे झाले

राज्यातील करोनाबाधितांची संख्या ६८१७ वर पोहोचली असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत, तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यातील करोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के आहे. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे.

First Published on: April 25, 2020 8:50 PM
Exit mobile version