घरCORONA UPDATECoronavirus: धक्कादायक, राज्यातील ९६ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

Coronavirus: धक्कादायक, राज्यातील ९६ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

Subscribe

कोरोना व्हायरस समूहात पसरू नये, यासाठी राज्यातले पोलीस दल अहोरात्र बंदोबस्ताची ड्युटी बजावत आहे. मात्र ही ड्युटी निभावत असताना राज्यातील ९६ पोलिसांना लॉकडाऊननंतर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये १५ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती पोलीस खात्याकडून मिळाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त संकेतस्थळावर दिले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दिलासादायक गोष्ट अशी की, यापैकी तीन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस शिपाई कोरोना व्हायरसपासून बरे झाले आहेत. या सात पोलिसांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत भारतीय दंड विधान कलम १८८ अंतर्गत ६९, ३७४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४,९५५ लोकांना अटक करण्यात आलेली आहे.

लॉकडाऊन दरम्यान काही ठिकाणी पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकारचे १४७ गुन्हे घडले असून त्यामध्ये ४७७ लोकांना अटक करण्यात आली आहे. तर कोरोनाची लक्षणे असलेल्या ज्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले होते, त्यातील पळून जाणाऱ्या लोकांना पुन्हा अलगीकरण करुन ठेवण्यात आले आहे. तब्बल ६०२ लोकांनी क्वारंटाइन केलेले असतानाही पळ काढला होता.

- Advertisement -

दरम्यान लॉकडाऊन असताना देखील दुधाचे टँकर, रुग्णवाहिका आणि इतर वाहनातून अनधिकृतरित्या माणसांची वाहतुक करणाऱ्यांवरही पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. अशाप्रकारचे १,०८४ गुन्हे नोंदविण्यात आले असून नियम डावलून वाहतूक करणारे ४७,१६८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये २ कोटी ६३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -