जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी ५  जूनला मतदान

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी ५  जूनला मतदान

पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील दोन  निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील सहा गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या ५  जूनला मतदान तर ६ जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी दिली.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. तर पोशेरा (मोखडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल.

संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचन गणांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत ती असेल. उमेदवारी अर्ज  १७  ते २३  मे २०२२  या कालावधीत दाखल करता येतील. २२  मे रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज  स्वीकारण्यात येणार नाहीत. उमेदवारी अर्जांची  छाननी २४  मे  रोजी होईल. तर ५ जून रोजी सकाळी साडेसात  ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी ६ जून रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.

First Published on: May 11, 2022 7:20 PM
Exit mobile version