मंत्र्यांसोबत तरुणीचे फोटो प्रसिद्ध झालेत तरीही, उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

मंत्र्यांसोबत तरुणीचे फोटो प्रसिद्ध झालेत तरीही, उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

टीकटॉकस्टार पूजा चव्हाण हीच्या आत्महत्या प्रकरणामुळे संशयाच्या फेऱ्यात अडकलेले वनमंत्री व शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावरून भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. तब्बल पंधरा दिवसांनंतर आज संजय राठोड पोहरादेवी गडावर पत्नीसह आले होते. त्यानंतर पूजाबरोबरचे राठोड यांचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. पण तरीही ठाकरे सरकार व शरद पवार गप्प का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ‘तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असलेले व लपून बसलेले राज्य सरकारमधील एक मंत्री आज १५ दिवसानंतर वाजतगाजत प्रकट झाले. प्रसिद्धी माध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष व गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली. तसेच त्या मंत्र्यांचे आत्महत्या केलेल्या तरुणी सोबतचे फोटोही प्रसिद्ध झाले . मग असे असताना या मंत्र्यांविरुध्द ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

त्या मंत्र्यांच्या विरोधात एवढे पुरावे समोर येत असतानाही राज्य सरकार मात्र बघ्याची भूमिका का घेत आहे? असा सवालही पाटील यांनी केला आहे. या प्रकरणावर राज्य सरकार कोणताही गुन्हा का नोंदवून घेत नाहीये.?, असे प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केले आहेत. सत्तेचा गैरवापर करत कायदा खिशात घालण्याची परिसीमा या ठाकरे सरकारने ओलांडली अशी जहरी टीकाही यावेळी पाटील यांनी केली आहे. तसेच ‘या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत?’, असा सवाल करत पाटील यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. तसेच जोपर्यंत त्या तरुणीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही असेही म्हटले आहे. त्याचबरोबर गुन्हेगाराला शिक्षा मिळालीच पाहिजे अशी मागणीही पाटील यांनी केली.


हेही वाचा – Breaking: पोहरादेवीतील गर्दीवर तात्काळ कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

 

First Published on: February 23, 2021 7:32 PM
Exit mobile version