वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री भेट; युती होणार का?

वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री भेट; युती होणार का?

prakash ambedkar

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटात युतीची चर्चा होत होती, परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात आता युती होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये काल मध्यरात्री महत्त्वाची बैठक झाली. जवळपास अडीच तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये युती होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात वर्षावर मध्यरात्री एक बैठक पार पडली. चर्चेदरम्यान फक्त आंबेडकर आणि शिंदे बैठकीत होते. त्या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अडीच तास बंद दाराआड चर्चा झाली असून, नेमकं काय ठरलं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. खरं तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे कधीही भाजपसोबत जाणार नाहीत. त्यामुळे त्यांनी शिंदे यांच्यासोबत यावं म्हणून पडद्यामागून प्रयत्न सुरू आहेत. काल मध्यरात्रीच्या भेटीत याच विषयावर चर्चा झाल्याचं समजतंय.

विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही भेटीला दुजोरा दिलाय. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली आहे. मात्र, इंदूमिलच्या स्मारकाबाबत या भेटीत चर्चा झाल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या सूत्रांनी सांगितलं. मात्र, इंदूमिलची चर्चा करण्यासाठी मध्यरात्री जाण्याची गरज काय?, असा प्रश्नही विचारला जात आहे. यासंदर्भात आज सकाळी 11.30 वाजता डॉ. प्रकाश आंबेडकर स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियाला याची माहिती देणार आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची युती होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे संजय राऊतांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी आमचीदेखील या आधी भेट घेतली आहे, दिल्लीतदेखील आम्ही भेटलो आहोत, अशा बैठक छुप्या नसतात, असंही संजय राऊत म्हणालेत.


हेही वाचाः शेतकरी पुन्हा उतरणार रस्त्यावर! 26 जानेवारीला देशव्यापी आंदोलनावर घेणार निर्णय

First Published on: January 12, 2023 11:12 AM
Exit mobile version