उन्हात ड्युटी करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सुविधा द्या, मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

उन्हात ड्युटी करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सुविधा द्या, मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

मुंबई : मे महिन्यातील रणरणत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. 55 वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Commissioner of Police Vivek Phansalkar) यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बुधवारी दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांची ही अवस्था पाहून एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना फोन केला आणि यापुढे 55 वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले.

हेही वाचा – ‘सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात तुम्हाला…’, करण सजनानींचा समीर वानखेडेंबाबत मोठा गौप्यस्फोट

तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना छत्री, जागोजागी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली. यापुढे 55 वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये. मुख्यमंत्र्यांच्या या सूचना अमलात आल्यानंतर वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाची प्रतीक्षा
मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर आल्यानंतर केली होती. बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलीस वसाहतीला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीच्या सद्यस्थितीची पहाणी देखील केली होती. आता त्याच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा पोलिसांना आहे.

हेही वाचा – विमानात विडी ओढणाऱ्या प्रवाशाला अटक; दिलेल्या माहितीने पोलिसही चक्रावले

First Published on: May 17, 2023 10:43 PM
Exit mobile version