मंदिर प्रवेशासाठी रामदास आठवले यांचे राज्यभर आंदोलन

मंदिर प्रवेशासाठी रामदास आठवले यांचे राज्यभर आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून मंदिरं, धार्मिक स्थळं बंद आहेत. राज्यातील प्रार्थना स्थळं खुली करावीत, यासाठी शनिवारी भाजपचे राज्यभरात घंटानाद आंदोलन केले. त्यानंतर , या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे देखील मंदिर प्रवेशासाठी रस्यावर उतरणार आहेत.

९ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

८ सप्टेंबर पर्यंत प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला नाही, तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ९ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे खुली करावीत, या मागणीसाठी सोमवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरातील शिवाजी चौक येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता रामदास आठवले यांच्या तर्फेही याच मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले.

पंढरपूरात सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

पंढरपूर येथील शिवाजी चौकात विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात दाखल झाले असून त्यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले. यावेळी शेकडो वंचित कार्यकर्ते आक्रमक झाले असून बॅरिकेट्स पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. याशिवाय अनेकांनी मास्कदेखील घातलेलेले नव्हते.

भाजपाचे घंटानाद आंदोलन

राज्यातील प्रार्थना स्थळं खुली करावीत, यासाठी शनिवारी भाजपचे राज्यभरात घंटानाद आंदोलन केले. मुंबई, शिर्डी, पुणे, नाशिकमध्येही घंटानाद आंदोलन करत मंदिरं सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात अनेक धार्मिक संघटना आणि संस्था सहभागी झाल्या होत्या.


आम्ही नियम मोडण्यासाठीच आलोय – प्रकाश आंबेडकर

First Published on: September 1, 2020 8:05 AM
Exit mobile version