रामदास आठवलेंच्या रिपाईंने नागालँडमध्ये उघडले खाते, दोन आमदार विजयी

रामदास आठवलेंच्या रिपाईंने नागालँडमध्ये उघडले खाते, दोन आमदार विजयी

 

नवी दिल्लीः पुण्यातील पोटनिवडणुकीसह त्रिपुरा, नागालॅंड, मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकालही गुरुवारी जाहिर झाला. अपेक्षेप्रमाणे त्रिपुरा व नागालॅंडमध्ये भाजपची सत्ता आली. मात्र या विजयापेक्षा चर्चा झाली ती खासदार रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(रिपाइं) दोन उमेदवार नागालॅंड येथे निवडून आल्याची. नागालॅंडमध्ये दोन उमेदवार निवडून आल्याने रिपाइंला स्फुर्ती मिळाली आली.

महत्त्वाचे म्हणजे रिपाइंची स्थापना महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रात सत्तेची दारे आठवलेंच्या रिपाइं गटाला उघडता आली नाही. मात्र महाराष्ट्राबाहेर थेट नागालॅंडला आठवले गटाच्या रिपाइंचे दोन उमेदवार निवडून आल्याने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. लिमा ओनेन चॅंग आणि तुएनसांग सदर हे आठवले यांच्या रिपाइं गटाकडून नागालॅंडमधून विजयी झाले आहेत.

राज्यसभेचे खासदार आठवले हे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सध्या भाजपकडून त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. आपल्या कवितांनी ते नेहमीच चर्चेत राहतात. राज्यसभेतील गंभीर वातावरण आठवले यांच्या कवितांमुळे थोड्या काळासाठी हलके फुलके होते. तरीही आठवले हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात. गेल्या महिन्यात आयआयटी मुंबई येथे एका मागासवर्गीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या आत्महत्येची चौकशी गुन्हे शाखेने करावी, अशी मागणी आठवले यांनी केली. यासाठी त्यांनी खास आयआयटी पवई येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, रिपाइंचे स्थानिक ज्येष्ठ नेते बाळ गरुड; सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यवंशी; आयआयटीचे विविध अधिकारी उपस्थित होते. आत्महत्या करणारा विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या कुटुंबीयांना आयआयटीने सांत्वनपर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.

 

सत्तेत वाटा मागणार- रामदास आठवले

नागालॅंडमध्ये पाच जागांवर आम्हाला विजय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आमचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. तीन उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नागालॅंडमध्ये आमचे विजयी उमेदवार एनडीएला पाठिंबा देतील. सत्तेत वाटा मिळावा यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय मंत्री अमित शाह यांची मी भेट घेणार आहे, असे खासदार रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

First Published on: March 2, 2023 8:27 PM
Exit mobile version