धार्मिक वादाचा त्र्यंबकेश्वरच्या पर्यटनावर होतोय परिणाम; भाविकांची संख्या रोडावली

धार्मिक वादाचा त्र्यंबकेश्वरच्या पर्यटनावर होतोय परिणाम; भाविकांची संख्या रोडावली

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाच्या वादाचा परिणाम भाविक तसेच पर्यटकांच्या संख्येवर जाणवत आहे. त्र्यंबकेश्वर संदर्भात येणार्‍या वृत्तामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असून यामुळे त्र्यंबककडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते. यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून ऐन सुटीच्या कालावधीत हा वाद निर्माण झाल्याने व्यावसायिकांचे मात्र मोठे नुकसान होत आहे.

उरुसाच्या मिरवणुकी दरम्यान त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्यासाठी मुस्लीम धर्मीय बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आले आणि त्यातून वाद उफाळून आला. हिंदू-मुस्लिम वादाची कधी साधी चर्चाही नसलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत तणावाची स्थिती निर्माण झाली. हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलने झाली, पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली. याचा परिणाम त्र्यंबकेश्वरमधील भाविकांच्या संख्येवर जाणवत आहे. रस्ते ओस पडले आहेत, चौक रिकामे झाले आहेत. हॉटलचे टेबल रिकामे आहेत, फुले, प्रसादाच्या साहित्याला ग्राहक नाहीत.

भाविकांची संख्या 40 ते 50 टक्क्यांनी रोडावली असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. त्र्यंबकेश्वरची उपजीविका मंदिरावर आणि इथे होणार्‍या कालसर्प शांती नारायण नागबली आशा विविध पूजांवर चालते. पूजाविधीसाठी येणार्‍या भाविकांमुळे येथील व्यवसायिकांची मोठी उलाढाल होते. यात सुटीच्या कालावधीत पर्यटकांची संख्या दुपटीने वाढते त्यामुळे सुटीचा कालावधी तर व्यावसायिकांसाठी सुगीचे दिवस असतात. मागील काळात कोविडमुळे मंदिरावंर असलेल्या निर्बंधामुळे येथील अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. मात्र आता त्र्यंबकेश्वरमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे येथील धार्मिक पर्यटनावर परिणाम दिसू लागला आहे. भाविकांची संख्या कमी झाल्याने त्यांच्या उत्पन्नावर परिणाम जाणवत आहे.

वाद मिटवा, स्थानिकांची मागणी 

 त्र्यंबकेश्वर नगरीत रोज हजारो भाविक येत असतात, त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यावरच गावगाडा सुरु असतो. मात्र एका घटनेने गावाची शांतता तर भंग झालीच आहे रोज एकमेकांच्या सुख-दुःखाला उभे राहणारे आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे. याची झळ आता प्रत्येकाच्या खिशाला जाणवू लागली आहे. त्यामुळे जो वाद सुरु आहे तो मिटून शांतता प्रस्थापित व्हावी अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत.

First Published on: May 19, 2023 2:41 PM
Exit mobile version