नोटबंदी हा दळभद्री निर्णय; शिवसेनेचे पंतप्रधान मोदींवर टीकेचे बाण

नोटबंदी हा दळभद्री निर्णय; शिवसेनेचे पंतप्रधान मोदींवर टीकेचे बाण

केंद्रातील मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयावर शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून टीकेचे बाण सोडले आहेत. नोटबंदी हा दळभद्री निर्णय अस्ल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. नोटबंदीचा उत्सव साजरा करणे म्हणजे उद्ध्वस्त लोकांच्या थडग्यावर बसून वाढदिवसाचा केक कापल्यासारखे आहे, असे सेनेने म्हटले आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय देशहिताच्या मुळावर आले. चुका मान्य करून पुढे जाणे हीच नेतृत्वाची धमक असते. पण चुकांचे समर्थन करणे ही नवी राजकीय परंपरा बनू लागली असे म्हणत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

“नोटबंदी हा आपल्या देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय होता. नोटबंदी निर्णयास चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निर्णयामुळे देशाचे, जनतेचे कसे कल्याण झाले त्यासाठी वारेमाप प्रसिद्धी करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी दावा केला आहे की, नोटबंदीमुळे काळा पैसा कमी होण्यास मदत झाली. पंतप्रधानांचे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. मुळात वायदा परदेशातील काळा पैसा पुन्हा हिंदुस्थानात आणण्याचा होता व या काळय़ा पैशांतून जनतेच्या बँक खात्यांत प्रत्येकी पंधरा लाख टाकू, असा श्री. मोदी यांचा शब्द होता. त्याचे काय झाले?” असा सवाल करत मोदींना त्यांच्या शब्दाची आठवण करुन दिली आहे.

“नोटबंदीमुळे कश्मीर खोऱयातील दहशतवाद संपून जाईल, असाही दावा होता. दहशतवादास जो अर्थपुरवठा केला जातो तो काळा पैसा असतो. त्यात बनावट नोटांचे प्रमाण जास्त असते. तेच आता बंद होईल, त्यामुळे कश्मीर खोऱयातील रक्तपातास लगाम लागेल, पण प्रत्यक्षात तसे काही झाले आहे काय?” असा सवाल शिवसेनेने केला आहे.

“महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या नटीच्या समर्थनासाठी जपजाप्य करतात, पण नोटबंदीने लाखो लोक निराधार, बेरोजगार झाले त्यांच्यासाठी सहानुभूतीचा शब्द निघत नाही. यात काही पारदर्शक वगैरे म्हणता येणार नाही. ‘नोटबंदी’ चार वर्षांची झाली. त्याचा उत्सव साजरा करणे म्हणजे या दळभद्री निर्णयामुळे ज्यांनी मरण पत्करले, नोकऱया गमावल्या, आत्महत्या केल्या, व्यापार-उद्योग उद्ध्वस्त झाले अशा सर्व उद्ध्वस्त लोकांच्या थडग्यावर बसून वाढदिवसाचा केक कापल्यासारखेच आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय देशहिताच्या मुळावर आले. चुका मान्य करून पुढे जाणे हीच नेतृत्वाची धमक असते. पण चुकांचे समर्थन करणे ही नवी राजकीय परंपरा बनू लागली आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प नेमके हेच करीत होते. त्यांची काय हालत झाली? याचे भान ठेवले तरी पुरे,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

 

First Published on: November 10, 2020 9:09 AM
Exit mobile version