सांगली-जळगाव ही तर नांदी; शिवसेनेचा भाजपला इशारा

सांगली-जळगाव ही तर नांदी; शिवसेनेचा भाजपला इशारा

सांगली-जळगाव ही तर नांदी; शिवसेनेचा भाजपला इशारा

सांगली महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. त्यानंतर आता सांगलीपाठोपाठ जळगाव महानगरपालिका देखील भाजपच्या हातातून गेली आहे. जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. दोन्ही महापालिकेत झालेल्या पराभवावरुन भाजपवर शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून इशारा दिला आहे. सांगली-जळगाव ही तर नांदी आहे, अजून बरेच कार्यक्रम पुढे होतील, असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.

“सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील! सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला. तेथील पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीचा महापौर केला. हा कार्यक्रम करेक्ट व्हावा यासाठी भाजपच्या १७ नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा पाहून मतदान केले. आता त्यापेक्षा करेक्ट कार्यक्रम जळगाव महानगरपालिकेतही झाला असून भाजपच्या २७ नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा ओळखून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मतदान केले. अशातऱ्हेने सांगलीपाठोपाठ जळगावात भाजपचा गड पडला आहे. जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे. भारतीय जनता पक्षाचा फुगा एकापाठोपाठ एक फुटू लागला आहे. महाराष्ट्रात भाजपला तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळीनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला,” असा टोला सेनेने लगावला.

“जळगाव भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता. महानगरपालिका निवडणुकीत इकडचे -तिकडचे लोक फोडून महाजन यांनी पालिकेत भाजपची सत्ता आणली. महाजन यांचा कारभार एकतंत्री व अहंकारी होता. त्यामुळेच भाजप नगरसेवक कंटाळले होते. महाजन यांचा अहंकार इतक्या टोकाचा की आपल्यात संपूर्ण क्षमता आहे, पक्षाने जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवतो, अशी भाषा ते करू लागले. इतरांना तुच्छ लेखण्याचा त्यांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला आहे,” असं म्हणत सेनेने गिरीश महाजनांना जोरदार टोला लगावला आहे.

“महाराष्ट्रात भाजपची सत्ता पाच वर्षे होती. त्या सत्तेतून पैसा व पैशांतून सर्व स्तरांवरील सत्ता विकत घेण्यात आल्या. पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपने रुजवला. पण महाराष्ट्रात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपला राज्याची सत्ता मिळवता आली नाही. सत्ता गेली की अक्कल जाते, अक्कल गेली की भांडवल जाते, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.


हेही वाचा – नाथाभाऊंचा ‘जळगाव फॉर्म्युला’, १० दिवसात केला भाजपचा ‘गेम’


 

First Published on: March 20, 2021 10:08 AM
Exit mobile version