वैफल्यग्रस्त माणसं आणि त्यांचा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो; राऊतांची पडळकर अन् सोमय्यावर टीका

वैफल्यग्रस्त माणसं आणि त्यांचा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो; राऊतांची पडळकर अन् सोमय्यावर टीका

मुंबईः गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांची प्रकरणं आवर घालण्यापलीकडे गेलेली आहेत. दोन्ही माणसांबद्दल महाराष्ट्रातील जनता निर्णय घेईल. शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या होणाऱ्या पुतळ्याच्या लोकार्पणाला राजकीय विरोध चुकीचा आहे. वैफल्यग्रस्त माणसं आणि त्यांचा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी जळजळीत टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी केलीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्गमध्ये जात आहेत, ही चांगली बाब आहे. प्रमोद सावंत यांना आमच्या शुभेच्छा आहे. गोव्याच्या जनतेनं भाजपला बहुमताइतका कौल दिला आहे. प्रमोद सावंत यांनी पाच लाख रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली होती ती पूर्ण करावी, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. डायरी प्रकरण ऐकून गंमत वाटली. बिर्ला सारडा डायरी प्रकरण होतं. त्यामध्ये देशात सत्तेत असणाऱ्या भाजपला सध्या 25 कोटी, 30 कोटी रुपये देण्यात आले होते. सीबीआयनं डायरी हा विश्वासार्ह पुरावा नाही, असं सांगितलं होतं. भाजपचं नाव आल्यानंतर तसं सांगण्यात आलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून धमकावण्याचं काम सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल धमक्या दिल्या आहेत. खोट्या डायऱ्याही तयार केल्या जाऊ शकतात. मला भाजपच्या कार्यपद्धतीवर संशय आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवरही हल्लाबोल केलाय.

सरकारचं जे धोरण आहे संपूर्ण देश विकण्याचं, सार्वजनिक उपक्रम विकण्याचं म्हणजेच देश विकण्याचं, त्या विरोधात अनेक संघटना एकत्र येऊन हा बंद पुकारतायत. फक्त निवडणुकांत रोजगार देण्याच्या घोषणा करायच्या, त्यानंतर तीन महिने फुकट रेशन द्यायचं, रोजगार कसा निर्माण करायचा, जोपर्यंत सार्वजनिक उपक्रमाला ताकद दिली जात नाही, तोपर्यंत रोजगार वाढणार नाही, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय. गेल्या 50 वर्षांत सर्वाधिक रोजगार हा पब्लिक सेक्टर्सनी दिलाय. गेल्या 50 ते 60 वर्षात सर्वाधिक रोजगार सार्वजनिक उपक्रमांनी दिला आहे. सरकारी उद्योग संपवून दोन पाच खासगी उद्योगांना आपल्या मर्जीतल्या लोकांच्या ताब्यात देश द्यायचा. यानं त्यांची संपत्ती वाढेल. पर्यायानं भाजपची संपत्ती वाढेल, हे धोकादायक आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्याविरोधात संघटनांचं आंदोलन सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

जर तुम्ही हिंदुत्ववादाचा पुरस्कार करताय, देव, देश आणि धर्म मानता असं म्हणताय, तर प्रत्येकानं आपलं वर्तन काय आहे, आपण किती खरं बोलतो, देवाच्या दरबारात हे तपासून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात ज्या प्रकारचा खोटेपणाचा कळस उभारला जातोय. विरोधी पक्षाकडून यथेच्छ बदनामी मोहीम राबवली जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात जे राबवलं जातंय. या लफंगेगिरीला हिंदुत्वात स्थान नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर हल्ला चढवलाय. खरं बोला, कधी कधी सध्या विरोधी पक्षाचं असं सुरू आहे की रेटून खोटं बोला, पण खोटं बोलण्यापेक्षा सहज आणि सत्य बोला, महाराष्ट्राची तीच परंपरा आहे, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र सरकारचं नाणारसंदर्भात मतपरिवर्तन होईल, असं म्हटलंय. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षणमंत्री आहेत, त्यांनी शिक्षणावर बोलायला हवं. त्यांच्या काळात त्यांनी मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण ते होऊ शकलं नाही, भारतात उत्तर पूर्व भागात हिंदू अल्पसंख्याक आहेत. सीमाभागात मराठी भाषिक अल्पसंख्यांक आहेत. त्यांच्या बद्दल सुप्रीम कोर्टात याचिका आहे. त्यांच्यावर अन्याय होणाऱ्याबद्दल कोणाला काही वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलंय.


हेही वाचाः राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात; तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा” : अजित पवार

First Published on: March 28, 2022 10:27 AM
Exit mobile version