कुणीही मनात आणलं तरी राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही – खासदार संजय राऊत

कुणीही मनात आणलं तरी राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही – खासदार संजय राऊत

ज्या भाजपसोबत तुम्ही आता आहात त्यांचं पहिलं सरकार आणण्यासाठीही समाजवादीनेच पाठिंबा दिला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी अभ्यास करावा, मग बोलावं, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.

एखाद्या पक्षाने जरी अल्टीमेटम दिला असला तरी त्यावर राज्य चालत नाही किंवा निर्णय घेतले जात नाहीत. प्रशासनाची एक व्यवस्था असते. येथे कायद्याचं राज्य असल्यामुळे कोणाच्या अल्टीमेटमवर निर्णय घेतले जात नाहीत. राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित आहे. सभेतून इशारे किंवा धमक्या दिल्या म्हणजे परिस्थिती बिघडली असं होणार नाही. त्यामुळे आम्ही काही इशारे दिले, याच्या भ्रमात कुणीही राहू नये. कुणीही मनात आणलं तरी देखील कोणीही राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

कुणीही मनात आणलं तरी राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आज शुभ दिवस आहे. तसेच आज अक्षय्य तृतीया आहे. मुस्लिम बांधवांचा रमजान सुद्धा आहे. त्यामुळे लोकांना त्यांचे सण आणि उत्सव साजरे करून द्यावे, तेवढचं आम्ही सांगू. तसेच कुणीही मनात आणलं तरी देखील कोणीही राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही. इतकं हे राज्य मजबूत पायावरती उभं आहे. या राज्याच्या प्रशासनाला फार मोठा अनुभव आहे. राज्याच्या कार्यकर्त्यांना देखील मोठा अनुभव आहे. कुणीही उठतो आणि धमक्या देतो असं चालणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

…त्या सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहीजे

मालेगावमध्ये मौलवी म्हणतायत की, जर भोंगे काढायला आलात तर हात परत जातील की नाही याची खात्री सुद्धा राहणार नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर राऊत म्हणाले की, एखाद्या राजकीय पक्षाला महाराष्ट्राची शांतता बिघडवायची असेल किंवा त्यासाठी त्यांना कुणी सुपारी दिली असेल तर त्यांना सर्वात आधी सरकारने त्या सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहीजे. सरकार त्यासाठी सक्षम आहे. काल मी मुख्यमंत्र्यांना भेटलो तसेच त्यांची चर्चा देखील केली, असं राऊत म्हणाले.

अल्टीमेटम देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेवर हल्ले करण्यासाठी बिनहिंमतीचे लोक छोटे-मोठे लोक आणि पक्ष पकडून आमच्यावर हल्ले करत आहेत. पण आम्ही या सगळ्याशी लढण्यासाठी सक्षम आहोत. अल्टिमेटम देणाऱ्यांनी प्रथम स्वत:चा पक्ष सांभाळावा. राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जी भूमिका देशात घेतली जाईल तीच महाराष्ट्रात घेतली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सक्षम आहेत. त्यामुळे कोणीही अल्टीमेटम देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते भ्रमात आहे, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक


 

First Published on: May 3, 2022 10:59 AM
Exit mobile version