आयोगाने पक्षपातीपणा करू नये, दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयानंतर राऊतांची प्रतिक्रिया

आयोगाने पक्षपातीपणा करू नये, दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयानंतर राऊतांची प्रतिक्रिया

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात ‘धनुष्यबाण’या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाहीये. दिल्ली हायकोर्टात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे. दरम्यान, यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने पक्षपात न करता निर्णय घेण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढतोयं, असं संजय राऊत म्हणाले.

दिल्ली हायकोर्टाने आमची याचिका फेटाळली आहे. पण आम्हाला न्यायालयीन लढाईत अशा प्रकारे गुंतवून ठेवण्याचं हे षडयंत्र आहे. तरीही शिवसेना आणि आमचे सहकारी ती लढाई नेटाने लढत आहेत. आमची एक याचिका फेटाळली आहे. पण जिद्द आणि लढा कायम आहे. हायकोर्टाने सांगितलंय की याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. फक्त आयोगाने पक्षपात करू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. असं संजय राऊत म्हणाले.

हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाऊन न्यायाची मागणी करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत. पण तुम्हाला माहिती आहे की, आपल्या देशात कशा प्रकारे दबावाचं राजकारण सुरू आहे. पण आम्ही निवडणूक आयोगाकडे पुन्हा जाऊ, असंही राऊत म्हणाले.

शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने गोठवलं होतं. आता अंधेरी पोटनिवडणूक झाली असून त्यात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा विजयही झाला आहे. यानंतर ठाकरे गटाने पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह आयोगाने गोठवण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका हायकोर्टाने फेटाळली असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आयोगाने यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश कोर्टाने यावेळी दिले आहेत.


हेही वाचा : राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचा मोर्चा; सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी


 

First Published on: November 15, 2022 10:45 PM
Exit mobile version